लातूर/धाराशिव : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने नागरिकांची संपत्ती लुटण्याचा डाव आखला आहे. तुमच्या कमाईतील 55 टक्के हिश्श्यावर कब्जा करून तो ते त्यांच्या व्होट बँकेला वाटू शकतात. कष्टाच्या कमाईवर अशी वाईट नजर असलेल्या काँगे्रसला घरी बसवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील सभेत केले. धाराशिव येथील सभेत काँग्रेसने मराठवाड्याचा विश्वासघात केल्याचा आरोप मोदी यांनी केला.
लातूर येथील सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. अशोक चव्हाण, महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे आदींची उपस्थिती होती. यावेळी मोदी म्हणाले, काँग्रेसची नजर केवळ तुमच्या वर्तमान कमाईवरच नाही तर तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी कमवून ठेवलेल्या संपत्तीवरही वारसा कराच्या रूपाने त्यांचा डोळा आहे. त्यांच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे. अशांना तुम्ही साथ देणार का, असा सवाल त्यांनी केला.
भारतीय अर्थव्यवस्था गतीने प्रगती करीत आहे. देशाच्या सीमेवर वाईट नजर ठेवण्याची आता कोणात हिंमत उरली नाही.
कोणी आगळीक केली तर त्याला कसा धडा शिकवतो हे सर्जिकल स्टाईलने दाखवले आहे, असे मोदी म्हणाले. धाराशिव येथे बोलताना मोदी यांनी तब्बल 60 वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने मराठवाड्याचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. या काळात ते शेतीला पाणी देऊ शकले नाहीत. काँग्रेसला सिंचन योजनांवर 60 वर्षांत जितके काम जमले नाही, तितके काम आम्ही केवळ 10 वर्षांत करू शकलो, असा दावा त्यांनी केला.
कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी उजनीत आणण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून जागतिक बँकेने यासाठी निधी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या भागास सुजलाम् सुफलाम् करण्याचे काम पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली होणार आहे. माळशिरस तालुका दहशतमुक्तकरणार आहे. ठोकशाही चालू देणार नाही. शिंदे, पवार व मोहिते-पाटील हे तीन नेते घराणेशाही टिकविण्यासाठी एकत्र आले आहेत, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.