Latest

नरेंद्र गिरी यांची हत्या की आत्महत्या?

Arun Patil

प्रयागराज ; वृत्तसंस्था : आखाडा परिषद अध्यक्षांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात आणखी एक धक्‍कादायक गोष्ट समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले त्यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, जमिनीवर महंतांचा मृतदेह दिसत असून, खोलीतील पंखा मात्र यावेळी चालू स्थितीत होता. पोलीस महानिरीक्षक के. पी. सिंह यासंदर्भात नरेंद्र गिरी यांच्या मठात राहणार्‍या शिष्यांची चौकशी करत असतानाही व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

ज्या खोलीत महंतांचा मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला, त्याच खोलीतील 1.45 मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये सुरुवातीलाच महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह जमिनीवर ठेवल्याचे दिसत असून, बाजूलाच महंतांचा कथित आत्महत्या पत्रात उत्तराधिकारी म्हणून उल्लेख असलेला बलबीर गिरी उभा असल्याचे दिसत आहे.

याच व्हिडीओमध्ये पंखाही चालू स्थितीत दिसत आहे. पंख्याच्या रॉडमध्ये तसेच महंतांच्या गळ्यात नॉयलॉनच्या दोरीचा एक तुकडा दिसत आहे. पोलीस महानिरीक्षक सिंह शिष्यांकडे चौकशी करत असताना सुमीत नावाचा शिष्य पंखा मी सुरू केल्याचे सांगत आहे. मात्र, सिंह याविषयी आणखी विचारणा करत असताना तो अन्य मुद्दे सांगू लागतो.

व्हिडीओ पाहिल्यानंतर महंतांनी ज्या दोरीने गळफास घेतला, त्याचे तीन भाग कसे झाले, असा सर्वात मोठा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दोरी कापून मृतदेह खाली उतरविला, असे मानले तरी हा प्रश्‍न अनुत्तरितच राहतो. कारण, अशा परिस्थितीतही दोरीचे दोनच भाग होतील. मात्र, खोलीत दोरीचे तीन तुकडे मिळून आले आहेत. पहिला तुकडा पंख्याच्या रॉडमध्ये, दुसरा तुकडा महंतांच्या गळ्यात, तर तिसरा तुकडा खोलीत पडलेल्या आरशाच्या टेबलवर मिळून आला.

आनंद गिरी उभारत आहेत गंगाकाठी लक्झरी आश्रम

* महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर ताब्यात घेतलेले त्यांचे शिष्य आनंद गिरी परवानगी नसतानाही गंगा नदीच्या काठी लक्झरी आश्रम उभारत आहेत. चित्रपट अभिनेत्री भूमिका चावलाचा पती आणि आध्यात्मिक शिक्षक भरत ठाकूर तसेच उत्तराखंडच्या एका मंत्र्याचाही आश्रम या ठिकाणी आहे. येथून काही अंतरावरच हेलिपॅडही आहे, ज्या ठिकाणाहून चारधामच्या यात्रेसाठी हेलिकॉप्टरचे उड्डाण होते.

* हरिद्वारपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील गाजीवाली गावात आनंद गिरी आश्रम उभारत आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आश्रमाचे बांधकाम सुरू झाले आहे. आठ महिन्यांत पायाभरणीही झाली आहे.

* विशेष बाब म्हणजे, आश्रमाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी कोणतीही परवानगी घेतलेली दिसत नाही. कुंभमेळा आणि कोरोनाच्या काळात जलदगतीने बांधकाम केले गेले. यासाठी राजकीय वरदहस्त लाभल्याचीही चर्चा आहे.

* महंतांच्या मृत्यूनंतर आता हरिद्वार-रूडकी विकास प्राधिकरणाच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. पथकाचे प्रमुख अधिकारी एम. एन. जोशी यांनी सांगितले की, या आश्रमाच्या इमारतीसाठी कोणतीही परवानगी घेतलेली नाही.

* गंगा नदीच्या काठापासून 200 मीटरचे अंतर राखणे आवश्यक होते. त्याचेही पालन केलेले नाही. त्यामुळे आम्ही ही इमारत सील करत आहोत. पुढील चौकशीनंतर ती पाडण्याचीही कारवाई केली जाऊ शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT