Latest

पुणे कस्टम्सने पकडली अंमली पदार्थांच्या तस्करांची टोळी, ५ कोटींचा मेथॅम्फेटामाइन जप्त

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे कस्टम विभागाने अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून पाच कोटी रुपये किमतीच्या मेथॅम्फेटामाइनसह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाई सोमवारी (दि.२९) रात्री उशिरा करण्यात आली.

कस्टम विभागाच्या नार्कोटिक्स सेलच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार, एका वाहनातून अंमली पदार्थ पुण्यात आणले जात असल्याचे समजले. माहितीच्या आधारे पथकातील अधिकाऱ्यांनी २९ मे रोजी रात्री पुण्याजवळील टोल प्लाझा येथे येणारे एक वाहन रोखले. वाहन चालकाने पथकाला पाहून वाहन उलट्या दिशेने नेऊन पळण्याचा प्रयत्न केला. पथकातील अधिकाऱ्यांनी आधीच रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहने उभे करून पळून जाणाऱ्या त्या वाहनचालकास अडवले व झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत १ किलो मेथॅम्फेटामाइन अंमली पदार्थ मिळून आला. जप्त केलेल्या अंमली पदार्थबाबत उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे दिसल्यानंतर चौघांना पथकातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. जप्त केलेल्या अमली पदार्थाचे बाजार मूल्य अंदाजे पाच कोटी रुपये असून हे चौघे ते कोणाला देणार होते याचा तपास केला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशीच कारवाई लोणावळा जवळील रस्त्यावरही करण्यात आली असल्याचे समजते. इथेही साधारणतः 200 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन मिळून आला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT