Latest

मुंबई : नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्‍याची तपासणी होणार !

निलेश पोतदार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामाची तपासणी व केलेल्या बांधकामाचे मोजमाप करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी के-पश्चिम विभागाने नोटीस बजावली आहे. त्यामुळेच शिवसेना व नारायण राणे यांच्यामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमकी घडणार आहेत.

भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. आमदार नितेश राणे यांनाही मारहाण प्रकरणी अटक झाली होती. आता त्यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकामाकडे शिवसेनेने आपले लक्ष केंद्रित केले आहे.

अंधेरी के-पश्चिम विभागाने एक नोटीस गुरुवारी रात्री उशिरा मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 488 अन्वये बजावली आहे. यात के-पश्चिम विभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाचे पथक शुक्रवारी जुहू तारा रोड येथील अधिश बंगल्याला भेट देऊन बंगल्याची पाहणी करून बेकायदा बांधकामांच्या तक्रारीची पडताळणी करणार असल्याचे कळवले आहे.

या पाहणीत बंगल्याच्या बांधकामाबाबतची कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगण्यात आले असल्याचे समजते. माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत त्यांच्या मागील तक्रारींवर पालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप करणारी स्मरणपत्र तक्रार दाखल केल्यानंतर पालिकेनेही नोटीस बजावल्याचे सांगण्यात येत आहे. सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करून समुद्राच्या 50 मीटर परिसरात हा बंगला बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असल्याचे समजते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT