Latest

नारायण राणे कुटुंबीयांकडे 137 कोटींची मालमत्ता; रत्नागिरी-सिंधुदुर्गातील सर्वांत श्रीमंत उमेदवार

अनुराधा कोरवी

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत:सह पत्नी नीलम राणे आणि कौटुंबिक मिळून सुमारे 137 कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. त्यांची वैयक्तिक मालमत्ता सुमारे 35 कोटी रुपयांची आहे. राणे यांच्यासह पत्नी व कुटुंबीयांवर सुमारे 28 कोटींहून अधिकचे कर्जही असल्याचे नमूद केले आहे. ते या मतदारसंघातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

शपथपत्रात राणे यांनी स्वत:चे वार्षिक उत्पन्न मागील आर्थिक वर्षात 49 लाख 53 हजार 207 असल्याचे नमूद केले आहे, तर पत्नीचे वार्षिक उत्पन्न 87 लाख 73 हजार 883 असून कौटुंबिक उत्पन्न 15 लाख 7 हजार 380 असल्याचे म्हटले आहे

राणे यांच्याकडे 1 कोटी 76 लाख 96 हजार 536 रुपयांचे 2552.25 ग्रॅम सोने तर 78 लाख 85 हजार 371 रुपयांचे हिरे आहेत. नीलम राणे यांच्याकडे 1 कोटी 31 लाख 17 हजार 867 रुपयांचे 1819.90 ग्रॅम वजनाचे सोने आहे. 15 लाख 38 हजार 572 रुपयांचे हिरे व 9 लाख 31 हजार 200 रुपयांची चांदी आहे. सोने, चांदी व हिरे असा राणे कुटुंबाकडे 9 कोटी 31 लाख 66 हजार 631 रुपयांचा किमती ऐवज आहे.
पनवेल, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवलीतील जानवली येथे जमीन आहे तर कणकवलीत बंगला अशी 8 कोटी 41 लाख 45 हजार 337 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. नीलम राणे यांच्या मालकीचे पनवेल, कणकवलीत जानवली, मालवण, पनवेल, कर्नाळा, कुडाळ, मालवणमध्ये गाळे, पुणे येथे ऑफिस, मुंबईत फ्लॅट अशी 41 कोटी 1 लाख 82 हजार 765 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

नारायण राणे यांच्या विविध बँकांत12 कोटींच्या तर नीलम राणे यांच्या सव्वादोन कोटींच्या ठेवी आहेत. राणे यांच्याकडे 55 लाखांचा बँक बॅलन्स असून 72 हजारांची रोकड आहे. सौ. राणे यांच्याकडेही 72 हजारांची रोकड आहे.

नारायण राणे यांच्याकडे इनोव्हा, मर्सिडिज बेंज, मारुती इर्टिगा तर नीलम राणे यांच्याकडे दोन स्कोडा, इको गाडी आहे. तर कुटुंबीयांच्या नावावर मर्सिडिज बेंज या गाड्या आहेत. विविध कंपन्यांमध्येही त्यांचे शेअर्स व पार्टनरशिप असून त्याचे मूल्य सुमारे 63 कोटी रुपये आहे. राणे यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे 35 कोटी तर नीलम राणे यांच्याकडे 75 कोटींची संपत्ती आहे. कौटुंबिक संपत्ती 27 कोटी रुपयांची आहे.

आठ ठाण्यांत राणेंवर गुन्हे

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अनुद्गार काढल्याप्रकरणी राणे यांच्यावर महाड, धुळे, ठाणे, नौपाडा, पुणे, जळगाव, अहमदनगर व नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT