Latest

नंदुरबार : लाचखोर पोलीस निरीक्षक वारे यांना एसीबीने रंगेहाथ पकडताच उमटला असंतोष

अंजली राऊत

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
नंदुरबार मागील काही महिन्यांपासून प्रचंड वादग्रस्त ठरलेले नवापूर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे एका संशयित आरोपीला अटक न करण्यासाठी एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून पकडले गेले आणि एकच खळबळ उडाली. त्यांना ताब्यात घेऊन जाणाऱ्या वाहनाला अडवून निरीक्षक वारे यांच्या गैरकारभारावर नाराज असलेल्या लोकांनी घोषणाबाजी करीत जाहीर संताप व्यक्त केला.

प्राप्त माहितीनुसार गुजरात राज्यात एका संशयित आरोपीवर गुन्हा दाखल असल्याने यातील आरोपीला अटक न करण्यासाठी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ठरलेल्या रक्कमेतीलन अर्धी रक्कम दि.५ मार्च रोजी देण्यात आली होती. तर उर्वरित रक्कम बुधवार (दि.२४) रोजी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या निवासस्थानी देण्याचे ठरले होते, अशी माहिती तक्रारदाराने दिली. दरम्यान, सदरची रक्कम स्विकारत असतांना नाशिक एसीबीच्या पथकाने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना रंगेहाथ पकडले. नाशिक एसीबीच्या पथकाने पोलीस निरीक्षक वारे यांना रात्री उशिराने नंदुरबार येथे नेले. नवापूर पोलिस ठाण्याबाहेर मोठा जमाव असल्याने सुरक्षेच्या कारणावरुन नंदुरबार येथे नेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलिस निरीक्षकांवर एसीबीची कारवाई होताच शहरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT