Latest

Nanded Hospital News : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात डुकरांनी तोडले रुग्णाचे लचके

दिनेश चोरगे

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शनिवारी एक भयंकर घटना घडली आहे. डुकरांच्या कळपाने एका रुग्णाचे लचके तोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील तुकाराम नागोराव कसबे (वय 35) हा क्षयरोगाच्या उपचारांसाठी या रुग्णालयात दाखल झाला होता. उपचारांनंतर गुरुवारी (दि. 9) त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. घरी गेल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा शुक्रवारी याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे गर्दी असल्याने रात्री जेवण करून तो परिसरातील चिंचेच्या झाडाखाली झोपला होता. झोपेत असतानाच डुकरांच्या कळपाने त्याच्यावर हल्ला चढवत त्याचे लचके तोडले. तुकारामच्या कमरेखालचा भाग, नाक, गालाचे डुकरांनी अक्षरशः लचके तोडून काढले. त्यामुळे तुकारामचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने धावपळ करत मृतदेह ताब्यात घेतला.

SCROLL FOR NEXT