Latest

दुसर्‍याचे वस्त्रहरण करणार्‍याचे झाले वस्त्रहरण : नाना पटोले

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भाजपने मागील नऊ वर्षांत महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप केले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडीओ एका खासगी वृत्तवाहिनीने दाखवलेला आहे. दुसर्‍याचे वस्त्रहरण करणार्‍याचे आज वस्त्रहरण झाले आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यासंदर्भात विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी किरीट सोमय्यांचा समाचार घेतला. 2014 पासून राज्यात सीबीआय, ईडी, आयकर विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून ब्लॅकमेल करण्याचे वातावरण सुरू आहे. जी व्यक्ती दुसर्‍याचे वस्त्रहरण करत होती त्याच व्यक्तीचे आता वस्त्रहरण झालेले आहे. मात्र, काँग्रेससाठी हा मुद्दा महत्त्वाचा नाही, तर जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. महागाई, शेतकरी, महिला, कायदा-सुव्यवस्था, तरुणांचे प्रश्न आहेत. महागाई गगनाला भिडली आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकार विधानसभेत घोषणा करते; पण मदत मात्र शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाही. हे प्रश्न मार्गी लावण्याचे काम काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचे आहे, असेही पटोले म्हणाले.

बेरोजगारीचा प्रश्न मोठा गंभीर आहे, सरकारी नोकर भरती करण्यात राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. राज्यात 50 ते 60 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. परंतु, ती भरली जात नाहीत आणि निवृत्त शिक्षकांना मानधनावर घेण्याचा अफलातून शासन आदेश जारी केलेला आहे. हा शासन आदेश शिक्षक होऊ पाहणार्‍या तरुण-तरुणींचा घोर अपमान करणारा आहे. या शासन आदेशाविरोधात पुण्यात बेरोजगार तरुण आंदोलनही करत आहेत. सरकारने या प्रश्नात लक्ष घालून तरुणांना न्याय दिला पाहिजे, असेही पटोले म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT