पुढारी ऑनलाईन: संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम महागाई आणली आहे. त्यांच्या मित्रांचा फायदा होण्यासाठी सर्वसामान्यांना लुटण्याचे काम सुरू आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते चिंचवड पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या प्रचासभेत बोलत होते.
चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक नाना काटे यांना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. आमदार नाना पटोले म्हणाले की, मी कॉलेजमध्ये असताना शीला दीक्षितचे सरकार कांद्याचे भाव वाढल्यामुळे पडले. मात्र, आज सर्वत्र महागाई आहे. खरं तर केंद्र सरकराने ही कृत्रिम महागाई आणली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठे कच्च्या तेलाचे भाव कमी झाले असताना मित्रांचा फायदा होण्यासाठी सर्वसामान्यांना लुटण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे.
नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, या लोकांना सत्तेची गुर्मी आली आहे. सध्या सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये लोकसभेत पंतप्रधानांनी एखाद्या पानटपरीवरल्या सारखे भाषण केले. ही किती मोठी घमेंड. मात्र, या घमेंडीचा अंत होत असतो, असे आपण रामायणातही पाहिले आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली.