Latest

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच उमेदवारांची नावे घोषित ; काँग्रेसला स्थान नाही

अमृता चौगुले

 किशोर बरकाले : पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलकडून 15 पैकी उर्वरित 5 जागांवरील उमेदवारांची नावे घोषित करण्यात आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला पॅनेलमध्ये स्थान देण्यात आले नसून एकूण १८ जागांपैकी व्यापारी-आडते आणि हमाल तोलणार गटाच्या 3 जागा वगळून विकास सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदार संघातील 15 जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत विकास सोसायटी मतदार संघातील एकूण 11 पैकी 7 जागांवरील उमेदवार शुक्रवारी ( दि.१४) घोषित करण्यात आले होते.

रविवारी (दि.१६) सकाळी सर्वसाधारण गटातील 3 आणि महिला प्रवर्गाची 1 जागा व ग्रामपंचायत गटातील 1 जागेवरील मिळून 5 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. विकास सोसायटी सर्वसाधारण गटातून रहाटवडे विकास सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय दिनकर चोरघे (रहाटवडे ), बाजार समितीच्या माजी उपसभापती अलका चरवड यांचे चिरंजीव कुलदीप गुलाबराव चरवड (वडगांव बुद्रुक), बाजार समितीचे माजी सभापती माणिकराव गोते यांचे चिरंजीव संदीप गोते (बिवरी-गोतेमळा ) यांचा समावेश आहे.

तर भारतीय जनता पक्षातून उरुळीकांचन येथील महादेव कांचन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शनिवारी (दि.१५) पक्ष प्रवेश केला आणि रविवारी लगेचच त्यांच्या पत्नी प्रतिभा कांचन यांना महिला प्रवर्गातून राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, बाजार समितीवरील यापूर्वीच्या संचालक मंडळावरील तत्कालीन संचालकांच्या नातेवाईकांचा भरणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतही दिसून आला आहे. तर ग्रामपंचायत मतदार संघातील 4 पैकी 3 जागांवर पहिल्या यादीत उमेदवार घोषित करण्यात आले होते. राहिलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती गटाच्या एका जागेवर नानासाहेब कोंडीबा आबनावे (बकोरी) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 बंडखोरीचे चित्र २० एप्रिलला स्पष्ट होणार…

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २० वर्षानंतर होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  पहिल्या यादीत 15 पैकी १० उमेदवार घोषित करण्यात आले. कारण उर्वरित नावावरुन पक्षात खल चालला होता, अखेर गेली 8 दिवस सतत सुरू असलेली काथ्याकूट संपुष्टात आली आहे. मात्र, पॅनलमध्ये नांवे समाविष्ट करण्यावरून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली असून बंडखोरीचे पडसाद उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे २० एप्रिल रोजी स्पष्ट होण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली.

" राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे विकास सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदार संघाचे एकूण 15 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. या निवडणुकीतील पॅनेलमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार नसला तरी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत आहे. महादेव कांचन यांनी शनिवारी (दि.१५) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.

                             – प्रदीप गारटकर , जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT