Latest

नागपूर : ‘एकच मिशन, जुनी पेंशन’; विधानभवनावर सरकारी कर्मचाऱ्यांचा जंगी मोर्चा

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : एकच मिशन, जुनी पेंशन या ध्येयाने प्रेरित विविध सरकारी कर्मचारी संघटनांनी 'महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना' अंतर्गत विधानभवनावर मंगळवारी (दि. १२) 'पेंशन जनक्रांती महामोर्चा'द्वारे जोरदार धडक दिली. जवळपास लाखावर कर्मचारी यात सहभागी झाले होते. जुनी पेंशन घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. पेंशन नाकारल्यास सत्तांतर करून दाखवू हा संदेश महामोर्चातून देण्यात आला. मोर्चेकऱ्यांची ही संख्या पाहून पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. यशवंत स्टेडियमवरून निघालेला हा मोर्चा मॉरिस कॉलेज टी पॉईंटवर अडविण्यात आला. सीताबर्डी भागातील वाहतूक कोलमडली होती.

'एकच मिशन, जुनी पेंशन' या मुख्य नारेबाजीसह 'नो पेंशन, नो व्होट, 'वोट फॉर ओपीएस' 'आमदार, खासदार तुपाशी, कर्मचारी उपाशी' अशी नारेबाजी व घोषणा देऊन सरकारी कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. यशवंत स्टेडियमपासून तर मॉरिस कॉलेज टी पॉईंटपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मोर्चाची गर्दी होती. राज्यभरातील शासकीय, निमशासकीय संवर्गातील सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने यशवंतराव स्टेडियम अक्षरशः हाऊस फुल्ल झाले होते. आरोग्य, शिक्षण, महसूल, कृषी, ग्रामसेवक, तलाठी, आश्रमशाळा, वनविभागातील कर्मचाऱ्यांचे लोंढे सतत स्टेडियमवर येत होते. महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५ पासून बंद केलेली जुनी पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांना पुन्हा बहाल करावी म्हणून संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला . मॉरिस कॉलेज चौकात मोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला संबोधित केले. जुनी पेंशन घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. पेंशन नाकारल्यास सत्तांतर करून दाखवू हा इशारा यावेळी देण्यात आला. पेंशन नाकारणाऱ्या सरकारला 'वोट फॉर ओपीएस'च्या माध्यमातून आराम करण्याची संधी दिली जाईल, असा इशारा खांडेकर यांनी दिला. दरम्यान,शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी यशवंत स्टेडियम येथे मोर्चाला भेट देऊन आपले समर्थन दिले. तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा भेट देऊन मोर्चाला संबोधित केले.

पाच तास वाहतूक ठप्प

पोलिसांच्या अंदाजापेक्षा खूप मोठा मोर्चा असल्याने व्हेरायटी चौक ते मॉरिस पॉईंटपर्यंत तसेच उड्डाणपूलही जवळपास ५ तास बंद होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चाची अनेक वाहने या मोर्चामुळे अडकली होती. सीताबर्डीत कोणत्याही रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण झाले होते. व्हेरीयटी चौकात जवळपास ३० हजार मोर्चेकऱ्यांनी ढोल, डफ, टाळ आणि खंजेरीच्या निनादात नृत्य करून जुन्या पेंशनची मागणी लावून धरली. रात्री उशिरा व्हेरायटी चौकातील रस्ता मोकळा झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT