Latest

Nagpur Flood | नागपूर पूरस्थिती : मृतांच्या आकड्यात वाढ; दोन महिलांचा मृत्यू, पाऊस थांबल्याने बचावकार्याला वेग

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शनिवारी (दि. २३) मध्यरात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहरात विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. यामध्ये 14 जनावरे गोठयात पाणी शिरल्याने दगावली. चार तासात 110 मिमी पाऊस झाल्याने मध्यवर्ती रेल्वेस्थानक, मोरभवन बस स्थानक पाण्याखाली आले. पूरसदृश्य भागात नागपूरचा वीज पुरवठा काही काळ खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. नागनदी, पिवळी नदी व नाले दुथडी भरून वाहू लागले. सखल भागात पावसाचे पाणी शिरले. बर्डीत पूल खचला, दोन दुकानेही खाली गेली. चहूकडे पाणीच पाणी झाल्याने बंद दुकाने, पार्किंग, बेसमेंटमधील वाहनांचे मोठे नुकसान झाले. महालक्ष्मीच्या निमित्ताने घरोघरी पाहुणे मंडळी होती या सर्वांना फटका बसला. आज (दि. २३) सकाळी बेसा, नरेंद्रनगर, वर्धा रोडवर ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुदैवाने आज सकाळपासून पाऊस थांबल्याने मदत कार्याला वेग आला. नागपूर दुपारपर्यंत बऱ्यापैकी पूर्वपदावर आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. (Nagpur Flood)

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या सतर्कतेने एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने दुपारपर्यंत बहुतांशी भागात परिस्थिती पूर्वपदावर आली. विविध ठिकाणी बचावकार्याद्वारे ४०० वर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. शनिवारी रात्री २ वाजता अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला सतत दोन तास विजांचा कडकडाटासह ४ तासात १०९ मि.मी. पाऊस कोसळला. यातील पहिल्या २ तासांमध्येच ९० मि.मी.पाऊस झाला. परिणामी शहरातील अंबाझरी तलावातील पाण्याचा ओव्हर फ्लो होवून हे पाणी नागनदीत प्रचंड प्रवाहाने शिरले. नदीकाठावरील घरांमध्ये पाणी घुसले. अंबाझरी आणि वर्मा ले आऊट तसेच शंकरनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी वस्तीमध्ये शिरले.

या परिस्थितीचा सामना करण्याकरिता सकाळीच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) आणि कामठी येथून लष्करांचे प्रत्येकी दोन दल दाखल झाले व बोटीने बचावकार्य सुरु झाले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी जिल्हयातील शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. बचाव कार्यादरम्यान शंकरनगर भागातील मुक व कर्णबधिर शाळेच्या तसेच एलईडी महाविद्यालयाच्या 43 विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यासोबतच शहराच्या सकल भागात पावसाचे पाणी साचल्याने अडकून पडलेल्या नागरिकांनाही बाहेर काढण्यात आले. नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून प्रशासनाने तयार केलेल्या निवारा केंद्रात त्यांना पाठविण्यात आले. दरम्यान, घरात पावसाचे पाणी शिरल्याने महेशनगर परिसरातील मिराबाई पिल्ले (७० वर्षे) आणि तेलंगखडी परिसरातील सुरेंन्द्रगड येथील संध्या डोरे (८० वर्षे) या दोन महिलांचा मृत्यू झाला.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी पहाटे ५ पासून प्रत्यक्ष घटनास्थळाला भेटी देत बचाव कार्याचे नियंत्रण केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा मुख्यालयात सीओसी वार रुममधून परिस्थितीचा आढावा घतला. हजारीपहाड (सह्याद्री) भागात गोठ्यात बांधलेली 14 जनावरे (सहा म्हशी, सहा गायी आणि दोन वासरे) मृत झाली. हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोठ्याचे व जनावरांचे मालक योगेश वऱ्हाडकर, राजेश वऱ्हाडकर आणि मृणाल घोघल यांचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सांत्वन केले. प्रशासनाला या घटनेचा तत्काळ पंचनामा करण्याचे व आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले. नंदनवन परिसरातील स्वातंत्र्य गल्ली क्र.४ व ६ झोपडपट्टी भागात घरांची पडझड झाली आहे. घरांमध्ये व रस्त्यावर पावसाचे पाणी शिरले आहे. प्रशासनाच्यावतीने कुंभारपुरा जुना बगडगंज येथील नागरिकांना घरातून सुरक्षित जागी जाण्याचे आवाहन करण्यात आले. धोकादायक घरातील नागरिकांना घरातून सुरक्षित जागी हलविण्यात आले आहे. निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. सक्करदरा गार्डन, मोरभवन बसस्थानकामध्येही पावसाचे पाणी शिरल्याचे चित्र होते. रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अंबाझरी पॉइंट व पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

दरम्यान, मनपा मुख्यालयातील 'श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर'(सीओसी) ला आज आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदिप जोशी यांनी भेट दिली तथा शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी डॉ. चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT