Latest

प्रवासी संख्येत नागपूर-बिलासपूर वंदे भारत प्रथम

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मध्य रेल्वेच्या अंतर्गत आठ वंदे भारत रेल्वेगाड्या धावत आहेत. त्यातील नागपूर-बिलासपूर वंदे भारत रेल्वेगाडीला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत असून, या गाडीतून महिन्याला 100 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. या गाडीचा इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासी संख्येत प्रथम क्रमांक लागतो, तर द्वितीय क्रमांक सोलापूर वंदे भारत गाडीचा लागत आहे.

नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये केंद्र शासनाने देशभरात 400 वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यानुसार रेल्वेच्या विविध विभागात वंदे भारत गाड्या धावण्यास सुरुवात झाली आहे. त्या गाड्यांचे जल्लोषात उद्घाटन झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. मध्य रेल्वेअंतर्गत सुरू असलेल्या या आठ गाड्यांची प्रवासी संख्या 50 ते 80 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

मध्य रेल्वेच्या अंतर्गत 8 वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू आहेत. त्या सर्व रेल्वेगाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व गाड्यांची प्रवासी संख्या 50 टक्क्यांपेक्षा अधिकच आहे. त्यामुळे या 8 गाड्यांना 25 टक्के सवलत लागू होणार नाही.
                            – डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

SCROLL FOR NEXT