Latest

आता दादला जाणार नांदायला ! नगर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : पती-पत्नीच्या वादावर अहमदनगरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने एक वेगळा निकाल दिला आहे. विवाहनंतर मुलगी सासरी म्हणजेच मुलाच्या घरी नांदायला जाते. ही तशी समाज रूढ पद्धत आहे. याच पद्धतीला छेद देणारा हा निकाल आहे. पतीने पत्नीविराेधात तक्रार दाखल केली हाेती. यावर तक्रारदार पतीनेच पत्नीकडे राहयला (नांदायला) जावे, असा निकाल वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एस. एस. पारवे यांनी दिला. पती-पत्नी दाेघे उच्च विद्याविभूषित. एक जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात, तर दुसरा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात नाेकरीला.

या दाेघांचा विवाह ऑगस्ट २०१४ मध्ये झाला. विवाहच्या दोन वर्षानंतर या दाेघांना एक मुल झालं. कालानंतराने दाेघांमध्ये वाद सुरू झाल्याने पत्नी नाेकरीच्या ठिकाणी राहू लागली. यानंतर पतीने पत्नीला जुलै २०१८ मध्ये परस्पर संमतीने घटस्फाेटासाठी नाेटीस पाठवून दिली. यावर न्यायालयात वाद सुरू झाले. पत्नीने वकीलामार्फत न्यायालयात बाजू मांडली. सासरच्याकडून हाेत असलेल्या छळाचं कथन केलं. नाेकरीच्या ठिकाणी पतीला बाेलावले. संसारसुखाची मागणी केली. यासोबतच पतीने दाखल केलेला घटस्फाेटाचा अर्ज नामंजूर करण्याची मागणी केली.

न्यायालयाने दाेन्ही बाजूचे अवलाेकन केलं. सर्वाेच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये दिलेल्या निकालांचा आधार घेतला. पती-पत्नीने एकमेकांवर केलेले आराेप फेटाळून लावले. दाेघे संबंध पुर्नस्थापित हाेण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. यानुसार पतीने दाेन महिन्याच्या आत वैवाहिक संबंध पुर्नस्थापित करावेत, असा आदेश वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एस. एस. पारवे यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या विविध निवाड्याचा आधार घेत दिला. वकील भगवान कुंभकर्ण आणि वकील शिवाजी सांगळे यांनी विवाहित महिलेच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडली आहे.

या निकालाबाबत अॅड. कुंभकर्ण म्हणाले, "लग्नानंतर मुलगी ही मुलाकडे, म्हणजेच सासरी नांदायला जाते, अशी समाज परंपरा आहे. अधुनिक काळात तसेच समान नागरी कायद्याचे अवलाेकन केल्यास कायद्यासमोर सर्व समान आहे. त्यामुळे काेणतीही परंपरा कायद्यापेक्षा माेठी ठरत नाही". वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने दिलेला हा निकाल तसाच आहे. महिलांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा, विचारांना बळ देणारा हा निकाल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT