Latest

‘ड’ जीवनसत्त्व मिळवण्यासाठी मशरूम गुणकारी

Arun Patil

नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे पनीरच्या भाज्या रुळलेल्या नव्हत्या. मात्र, हल्ली लग्नसमारंभापासून ते घरातील 'स्पेशल जेवणा'पर्यंत पनीरच्या पंजाबी डिशेश लोकांच्या स्वयंपाकघरात आणि जीभेवरही चांगल्याच रुळल्या आहेत. मशरूमच्याही पदार्थांचे आता असेच होत आहे. बटण मशरूमपासून बनवलेले पदार्थ अनेक घरांत आवडीने खाल्ले जातात. अर्थातच मशरूम हे केवळ चवीसाठी नव्हे, तर आरोग्यासाठीही गुणकारी ठरते, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

थंडीच्या दिवसांत अनेक आजार आपल्या अवतीभवती असतात. अशातच आपले डाएट योग्य ठेवणे गरजेचे असते. या बदलत्या वातावरणाशी लढण्यासाठी आपण निरोगी असणे गरजेचे असते. अशातच मशरूम ही अशी गोष्ट आहे, जी तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळवून देते. मशरूम आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. हे तुम्ही ग्रेव्हीच्या भाजीत तसेच सॅलड, सँडविच, पिझ्झा, मिक्स व्हेज, मंच्युरियन म्हणूनही खाऊ शकता.

शरीराला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच हाडांच्या आरोग्यासाठी 'ड' जीवनसत्त्व आवश्यक असते. त्यासाठी कोवळ्या उन्हात बसणे हा एक चांगला मार्ग आहे. मात्र, व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांना उन्हात बसायला वेळ मिळत नाही. त्यामुळे 'व्हिटामिन डी'ची कमतरता होते. अशातच तुम्ही व्हिटामिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी मशरूमचे सेवन करू शकता. मशरूममध्ये व्हिटामिन डी, बी, सेलेनियम, पोटॅशियम आणि कॉपर मोठ्या प्रमाणात असते. हे व्हिटामिन्स शरीराला विविध आजारांशी लढण्यास मदत करतात. मशरूममध्ये बायोअ‍ॅक्टिव्ह कंपाऊंड मोठ्या प्रमाणात असतात जे इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात.

यात बीटा ग्लुकेन नावाचे तत्त्व असते जे थंडीत येणार्‍या सर्दी तापासासाठी तसेच इन्फेक्शनविरोधात लढण्यास मदत करते. मशरूम्समध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंटस् असतात जे सेल्युलार हेल्थ मजबूत करतात आणि स्ट्रेस रीलिज करतात. वजन घटवण्यासाठी जे लोक दिवस-रात्र मेहनत करत आहेत, त्यांनी आपल्या डाएटमध्ये मशरूम्सचा समावेश करावा. यातील फायबर्स फॅट कमी करण्यास मदत करतात.

SCROLL FOR NEXT