पुढारी ऑनलाईन डेस्क : Musheer Khan Ranji Trophy Final : मुंबईचा युवा फलंदाज मुशीर खानने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावून भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा 29 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. रणजी ट्रॉफी फायनलमध्ये शतक झळकावणारा मुशीर हा आता मुंबईचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने 19 वर्षे 14 दिवसांत ही कामगिरी केली आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याने 1994-95 च्या मोसमात वयाच्या 22 व्या वर्षी पंजाबविरुद्ध शतक पूर्ण केले होते.
मुशीरने सोमवारी (दि. 11) सामन्याच्या दुस-या दिवशी दुसरा डाव खेळताना आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मंगळवारी (दि.12) तिसऱ्या दिवशी तो फलंदाजीला आला तेव्हा त्याने आपला कर्णधार अजिंक्य रहाणेसह संघाचा डाव पुढे नेला. रहाणे बाद झाल्यावर मुशीरने श्रेयस अय्यरच्या साथीने आपले शतकही पूर्ण केले. आता तो रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईसाठी शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. तो 136 धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने 326 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकार मारले. त्याच्या या खेळीमुळे मुंबईच्या एकूण आघाडीने 500 धावांचा टप्पा ओलांडला. मुशीर शिवाय श्रेयस अय्यरने 95 तर अजिंक्य रहाणेने 73 धावा फटकावल्या.
मुशीर रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये नवा विक्रम रचत असताना वानखेडे मैदानावर सचिन तेंडुलकरसह भारताचा कर्णधार रोहित शर्मा उपस्थित होते. तसेच मुशीरचे वडील नौशाद खान हे देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते. ते आपल्या मुलाच्या या कामगिरीचे कौतुक करताना दिसले. यापूर्वी त्यांचा मोठा मुलगा सरफराज खान याने भारताकडून इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले आहे. (Musheer Khan Ranji Trophy Final)