Latest

कोल्हापूर : वर्चस्ववादातून लक्षतीर्थ वसाहत परिसरात दोघांवर खुनी हल्ला

अमृता चौगुले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वर्चस्ववादातून लक्षतीर्थ वसाहत येथील सासने कॉलनीमधील चौकात तलवारीसह धारदार शस्त्राने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात संतोष सोनबा बोडके (वय 40, रा. लक्षतीर्थ वसाहत) हा गंभीर जखमी झाला. अतिरक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली आहे. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात कृष्णात कोंडिबा बोडेकर (वय 35) हा देखील गंभीर जखमी झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने लावण्यात आलेले पोस्टर फाडल्याच्या कारणातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या घटनेमुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गंभीर अवस्थेतील संतोष बोडके याला रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तलवारीसह अन्य शस्त्राने डोक्यात, पाठीवर, हातावर वर्मी हल्ला करण्यात आला आहे. बोडके रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. किमान पाच ते सहा जणांनी हल्ला केल्याचे सांगण्यात आले. सहायक फौजदार भगवान गिरीगोसावी, हवालदार संजय कोळी यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून वर्चस्ववादातून दोन गटांतील वाद धुमसत आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास संशयित हल्लेखोरांनी बोडके याच्यावर खुनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. जखमी बोडके याच्या नातेवाईकांसह लक्षतीर्थ वसाहतीमधील तरुणांची शासकीय रुग्णालय आवारात रात्री उशिरा मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे शासकीय रुग्णालय रुग्णालय आवारातही पोलिसांचा फौजफाटा पाचारण करण्यात आला.

SCROLL FOR NEXT