मुंबई ः पुढारी डेस्क : तापमानवाढीमुळे देशातील बहुतांश राज्ये भाजून निघत आहेत. दक्षिण भारतात हे तापमान अंमळ अधिक भासत आहे. ते गेल्या 51 वर्षांतील सर्वाधिक तापमान ठरले आहे. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार गेल्या तीन आठवड्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली असून ते 38 अशांच्या पुढेच आहे.
बंगळुरू, मुंबई आणि पश्चिम बंगालमध्ये कालयीकुंड या शहरांना वाढलेल्या तापमानाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कालयीकुंडमध्ये तर मंगळवारी 47.2 इतके तापमान नोंदवले गेले. दक्षिण भारतात सर्वसाधारणपणे 37 अंशांपर्यंत तापमान असते. एप्रिल 2016 मध्ये सर्वाधिक 37.6 अंश तापमान नोंदवले गेले होते. या खेपेस बंगळुरू शहर एप्रिलमध्ये सर्वाधिक उष्ण म्हणून नोंदवले गेले. उद्यानांचे शहर असलेल्या बंगळुरुमध्ये सलग सहा दिवस प्रचंड उष्णतामान होते.
पूर्व भारतामध्ये देखील एप्रिलमध्ये 1973 नंतर रात्रीचे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार या ठिकाणी तर सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी या तिन्ही राज्यांमध्ये 40 ते 42 अंशांपर्यंत तापमान होते. कोलकाता येथे तापमान 43 अंशांवर गेले होते. याआधी कोलकातामध्ये 43.9 अंश इतके सर्वोच्च तापमान नोंदवले गेले होते. झारखंडच्या सिंगभूम जिल्ह्यातील बहारागोरा याठिकाणी तापमान 47.1 अंशावर पोहोचले होते, तर ओडीशामधील बालासूर आणि पश्चिम बंगालमधील पनागढ येथील तापमान सर्वसामान्य तापमानापेक्षा तब्बल दहा अंशांनी वाढले आहे. कोलकातामधील डमडम येथे तापमानाचा पारा 43 अंशांवर गेला होता.
हवामानखात्याच्या नोंदीनुसार या राज्यांमध्ये सलग 16 दिवस तीव्र उष्णतेची लाट येऊन गेली. याआधी ओडिशामध्ये 1998 साली तब्बल 26 दिवस उष्णतेची लाट होती. प्रशांत महासागरातील अलनिनोच्या प्रभावामुळे तापमानात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. तर बंगालच्या उपसागरात वादळविरोधी वातावरण निर्माण झाल्याने समुद्रावरून येणारे वारे थंडावल्याचे हवामान खात्याने सांगितले.
मंगळवारची उष्ण ठिकाणे
कलायीकुंडा (पश्चिम बंगाल) 47.2
बहारगोरा (झारखंड) 47.1
बारीपाडा (ओडीशा) 46.4
दक्षिण भारत सरासरी 37.2
बंगळुरू 38.3
कोलकाता 43 अंश
पूर्व भारत 22.1
(50 वर्षातील सर्वाधिक)