Latest

Best Bakery case | बेस्ट बेकरी हत्याकांड, १० वर्षे तुरुंगात असलेल्या दोघा आरोपींची निर्दोष मुक्तता

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : गुजरातमधील बेस्ट बेकरीच्या आवारात घडलेल्या १४ जणांच्या हत्याकांड प्रकरणी ( Best Bakery case) आज ( दि. १३ जून) मुंबईतील विशेष न्यायालयाने निकाल दिला. (Best Bakery case) बेस्ट बेकरी प्रकरणी न्यायालयाने हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. १ मार्च २००२ रोजी बेस्ट बेकरी येथे सुमारे १ हजार लोकांच्या जमावाने केलेल्या हल्ल्यानंतर १४ लोकांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडातील सहभाग असल्याच्या आरोपाखाली गेली १० वर्षे तुरुंगात असलेल्या दोघा आरोपींची सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणात एकूण चार आरोपीविरुद्ध खटला सुरु होता. यातील दोघांचा खटला सुरु असताना मृत्‍यू झाला होता. बेस्ट बेकरी हत्याकांड घडून तब्बल २१ वर्षे उलटल्यानंतर २ आरोपींच्याबाबत न्यायालयाने फैसला दिला आहे.

मफत आणि हर्षद यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत खून, पुरावे नष्ट करणे आणि खुनाचा प्रयत्न यासह आरोप होते. अन्य दोन आरोपी जयंतीभाई गोहिल आणि रमेश उर्फ रिंकू गोहिल यांचा तुरुंगातच मृत्यू झाला होता. २०१२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने चार आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती आणि इतर पाच जणांची निर्दोष मुक्तता केली होती.

बेकरीमधील चार गंभीर जखमी कामगारांच्या पुराव्याच्या आधारावर उच्च न्यायालयाने २०१२ मध्ये संजय ठक्कर, दिनेश राजभर, जीतू चौहान आणि शानाभाई बारिया यांना हत्येप्रकरणी दोषी ठरवले. न्यायालयाने जाहिरा शेख आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाची साक्ष ग्राह्य धरली. झाहिराच्या याचिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा खटला चालवण्याचा आणि हा खटला मुंबईत हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते.

काय घडले होते त्यावेळी नेमके?

१ मार्च २००२ रोजी वडोदरा येथील हनुमान टेकडीवरील बेस्ट बेकरीवर संतप्त जमावाने हल्ला केला. गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेस जाळल्यानंतर ही घटना घडली होती. या जमावामध्ये हर्षद सोलंकी व मफत गोहिल या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप होता. हे दोघे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. या हत्याकांडात सहभाग असल्याच्या आरोपाखाली गेली १० वर्षे तुरुंगात असलेल्या दोघा आरोपींचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने राखून ठेवला होता. सत्र न्यायालयात एकूण चार आरोपीविरुद्ध खटला उभा राहिला होता. मात्र दोघा आरोपींचा मृत्यू झाला. सोलंकी व गोहिलविरुद्ध सरकारी पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले.

न्यायालयाने १७ जानेवारीला निकाल राखून ठेवला होता. मात्र उच्च न्यायालयाने कालमर्यादा आखून दिलेल्या प्रकरणांच्या सुनावणीमध्ये सत्र न्यायालय व्यस्त असल्याने बेस्ट बेकरी खटल्याचा निकाल लांबणीवर पडला होता.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT