Latest

Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफी जिंकताच मुंबई संघासाठी 5 कोटी रुपयांचे अतिरिक्त बक्षीस जाहीर!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ranji Trophy Final : विदर्भाचा पराभव करून मुंबईने विक्रमी 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरले. या विजयानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मोठी घोषणा करत मुंबई संघासाठी 5 कोटी रुपयांचे अतिरिक्त बक्षीस जाहीर केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) एक निवेदन जारी करून याची माहिती दिली आहे.

एमसीएचा मोठा निर्णय

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला. 538 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ सामन्याच्या शेवटच्या पाचव्या दिवशी 368 धावांवर ऑलआऊट झाला. यासह मुंबईने 2016 नंतर तब्बल 8 वर्षांनी रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. या विक्रमी कामगिरीनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सचिव अजिंक्य नाईक यांनी एक निवेदन जारी केले. ज्यात म्हटलंय की, 'एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे आणि ॲपेक्स कौन्सिलने चॅम्पियन संघाची बक्षीस रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबई रणजी संघाला एमसीएकडून अतिरिक्त 5 कोटी रुपये देण्यात येईल. एमसीएसाठी हे वर्ष आतापर्यंत खूप चांगले गेले आहे, कारण असोसिएशनने सात विजेतेपदे जिंकली आहेत आणि आम्ही बीसीसीआय स्पर्धांमध्ये सर्व वयोगटांमध्ये बाद फेरी गाठली आहे.'

Ranji Trophy Final : असा झाला सामना

मुंबईने गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर विदर्भाचा 169 धावांनी पराभव करून विक्रमी 42वे रणजी विजेतेपद पटकावले. रणजी ट्रॉफीच्या विजेतेपदाच्या सामन्यात विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला. त्यानंतर मुंबईने आपल्या दुसऱ्या डावात मुशीर खानचे (136) शतक आणि श्रेयस अय्यर (95), अजिंक्य रहाणे (73), (नाबाद 50) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 418 धावा करून विदर्भला विजयासाठी 538 धावांचे लक्ष्य दिले.

प्रत्युत्तरात विदर्भच्या संघाने चौथ्या दिवसाअखेर 5 बाद 248 धावा केल्या. त्यांना सामन्याच्या शेवटच्या पाचव्या दिवशी विजयासाठी 290 धावांची गरज होती. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांच्यात सहाव्या विकेटसाठी झालेल्या 130 धावांच्या भागीदारीमुळे मुंबईला सकाळच्या सत्रात एकही विकेट मिळाली नाही. पण चहापानाच्या आधी सलग दोन षटकांत प्रथम अक्षय आणि नंतर हर्ष बाद झाल्यानंतर विदर्भाचा डाव गडगडला आणि संपूर्ण संघ 368 धावांत आटोपला.

तनुष कोटियनने एकूण 4 बळी घेतले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून पदार्पण करणाऱ्या सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर याने अंतिम सामन्यात दमदार फलंदाजी केली. मुशीरने दुसऱ्या डावात 136 धावा केल्या होत्या. यानंतर विदर्भाच्या दुसऱ्या डावात दोन फलंदाज बाद केले. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. तुषार देशपांडेनेही 2 बळी घेतले. तत्पूर्वी, मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ पहिल्या डावात 105 धावांत सर्वबाद झाला होता.

SCROLL FOR NEXT