मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने बुधवारी ८ तासांच्या चौकशीनंतर अटक केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, आज (गुरूवार) सकाळी नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राज्यातील मंत्र्यांनी आंदोलन केले.
शक्तिप्रदर्शन करत महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. तसेच मलिक यांना पाठिंबा दिला. तर दुसरीकडे शिवसेनेच्या मंत्र्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. त्यामुळे याचीच चर्चा मंत्रालय परिसरात दबक्या आवाजात सुरू होती.
मनी लॉड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) बुधवारी सकाळी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते. ईडी कार्यालयात ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. सकाळी ७ वाजता ईडीचे अधिकारी चौकशीसाठी मलिकांच्या घरात दाखल झाले होते. त्यानंतर मलिक यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आले होते.
राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला असतानाच ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी मागील आठवड्यात दक्षिण मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहीम याच्या मालमत्तांशी संबंधित प्रकरणात त्याचा जेलमध्ये असलेला भाऊ इक्बाल कासकर, मृत बहीण हसीना पारकर यांच्या घरांसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या पथकांनी छापे टाकले होते. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिक (Nawab Malik) यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती.