Latest

राजमाता जिजाऊ : तेजःपुंज कर्तृत्वाचा आलेख

backup backup

राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाची चर्चा आणि मीमांसा करताना इतिहासकार आणि राजकीय विश्लेषक थक्क होतात. कारण, त्यांनी केलेले कर्तृत्व हे मध्ययुगीन भारताला एक नवी दिशा देणारे ठरले. जगाच्या इतिहासात थोर पुरुषांच्या मातांनी दुर्गेप्रमाणे कार्य केले. अशा थोरमातांचा क्रम लावायचा ठरला तर जगाच्या इतिहासात खरोखरच राजमाता जिजाऊंना अव्वल स्थान द्यावे लागेल. आज (गुरुवार) जिजाऊंची जयंती…

जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उत्तुंग ध्येयवाद, आदर्श मातृशक्ती तसेच अजोड व्यवस्थापन कौशल्य या त्रिगुणांचा अद्भुत संगम झालेला होता. माणसांची पारख तसेच संकटकाळात मात करण्यासाठी लागणारे धैर्य आणि साहस यामुळे त्यांना प्राप्त झालेली दिव्य दृष्टी त्यांनी प्रत्यक्षात कृतीमध्ये आणली आणि इतिहासाला कलाटणी दिली. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मुघलांच्या आणि दक्षिणेतील बहामनी साम—ाज्याची शकले झालेल्या पाच शाह्यांच्या अन्याय आणि जुलमांनी रयत त्रस्त झाली होती.

अशा अंधारलेल्या काळोखात प्रकाशाचे तेजस्वी सूर्यबिंब उदयास आले ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने. या तेजस्वी महासूर्यास आकार देण्याचे, संस्कारित करण्याचे आणि एखाद्या कुशल शिल्पकाराप्रमाणे घडविण्याचे कार्य ज्या विभूतीने केले, त्या महान विभूतीचे नाव राजमाता जिजाऊ. जिजाऊंचा जन्म सिंदखेडराजा या गावाजवळील देऊळगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई.

जिजाऊंनी 1598 ते 1674 या 75 वर्षांच्या आयुष्यात भारतीय इतिहासाला ज्या पद्धतीने विलक्षण कलाटणी दिली आणि ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली, ते कार्य इतिहासात अमर ठरले आहे. या कार्याचे महत्त्व प्रामुख्याने तीन अंगांनी अधिक स्पष्ट करता येईल. पहिली गोष्ट म्हणजे, दक्षिणेतील निजामशाही, आदिलशाही आणि उत्तरेतील मुघल यांची अस्मानी, सुलतानी संकटे महाराष्ट्रावर चालून आली असताना या संकटांशी मुकाबला करण्यासाठी योजतत्त्व, व्यवस्थापन आणि गनिमीकाव्याचे युद्धतंत्र विकसित करण्यासाठी त्यांनी महापराक्रमी शिवरायांना तत्त्व आणि सिद्धांत तसेच व्यवहार करण्याची दिशा दिली.

दुसरी गोष्ट म्हणजे, एक राष्ट्रमाता आपल्या पुत्रावर कोणते संस्कार करू शकते आणि त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी करू शकते आणि त्यास कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी कशा पद्धतीने व्यूहरचना करावी याचे शिक्षण देऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ होय. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उत्तुंग ध्येयवाद, आदर्श मातृशक्ती तसेच अजोड व्यवस्थापन कौशल्य या त्रिगुणांचा अद्भुत संगम झालेला होता. माणसांची पारख तसेच संकटकाळात मात करण्यासाठी लागणारे धैर्य आणि साहस यामुळे त्यांना प्राप्त झालेली दिव्य दृष्टी त्यांनी प्रत्यक्षात कृतीमध्ये आणली आणि इतिहासाला कलाटणी दिली.

अतुलनीय कर्तृत्व

राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाची चर्चा आणि मीमांसा करताना इतिहासकार आणि राजकीय विश्लेषक थक्क होतात. कारण, त्यांनी केलेले कर्तृत्व हे मध्ययुगीन भारताला एक नवी दिशा देणारे ठरले. जगाच्या इतिहासात थोर पुरुषांच्या मातांनी दुर्गेप्रमाणे कार्य केले. अशा थोरमातांचा क्रम लावायचा ठरला तर जगाच्या इतिहासात खरोखरच राजमाता जिजाऊंना अव्वल स्थान द्यावे लागेल. त्यांच्या या अतुलनीय कर्तृत्वाची मांडणी करताना तीन टप्पे प्रामुख्याने लक्षात घ्यावे लागतात.

पहिला टप्पा हा शिवनेरीवर झालेल्या शिवरायांच्या जन्माचा आणि त्यांच्यावर जिजाऊंनी केलेल्या संस्कारांचा होय. दुसरा टप्पा हा आज भारतातील मोठे महानगर असलेल्या पुण्यनगरीची प्रशासकीय व्यवस्था लावण्यात त्यांनी केलेल्या कार्याचा. तिसरा टप्पा हा स्वराज्याच्या उभारणीचा; जो प्रतापगडाच्या युद्धापासून सुरू होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत गतिमानपणे पूर्ण होतो.

या तीन टप्प्यांतून राजमाता जिजाऊंचे कर्तृत्व तप्त मुशीतून बाहेर पडलेल्या सोन्यासारखे सतत चमकत राहते. त्यांची चर्चा करताना विश्वाच्या इतिहासातील पहिल्या क्रमांकाची राष्ट्रमाता म्हणून आपणास त्यांची नोंद करावी लागते. सर यदुनाथ सरकार यांनी 'शिवाजी अँड हिज टाइम्स' नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या निष्कर्षात त्यांनी असे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महान कर्तृत्वान पुरुष होते. शिवाजी महाराजांनी आजच्या काळात ज्याला कल्याणकारी राज्य म्हणता येईल असे राज्य उभारले. आणि भारताच्या इतिहासावर अमिट अशी छाप निर्माण केली.

सरकार यांनी पुढे म्हटले आहे की, गंगेच्या काठावर उभ्या असलेल्या वटवृक्षाप्रमाणे शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची छाया उभ्या भारतवर्षाला प्रदान केली. कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी 'शिवाजी दी ग्रेट' या नावाचे तीन खंड प्रकाशित केलेले आहेत.

डॉ. बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व खरोखरच मध्ययुगीन इतिहासातच नव्हे, तर संबंध जगाच्या इतिहासात कसे श्रेष्ठ आहे याचे विश्लेषण केले आहे. याहीपेक्षा त्यांनी शिवचरित्रातील महत्त्वाचे कलाटणी देणारे प्रसंग, प्रशासकीय चातुर्य, व्यवस्थापन कौशल्य आणि अष्टप्रधान मंडळाचा लोकशाही पद्धतीने चालविलेला कारभार आणि लोककल्याणासाठी घेतलेले निर्णय या पद्धतीने मांडणी केलेली आहे.

डॉ. बाळकृष्ण यांच्या पहिल्या खंडात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनशिल्प कोरण्यात जिजाऊंनी घडलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे, ही गोष्ट प्रामुख्याने नमूद केली पाहिजे. जिजाऊंनी स्वराज्याची भक्कम उभारणी तर केलीच; पण त्याचबरोबर स्वराज्यावर आलेल्या संकटांशी सामना करण्यासाठीचे मनोधैर्यही दिले. राज्याभिषेकाचा मंगल क्षण पाहिल्यानंतर अल्पावधीतच जिजाऊंचे महानिर्वाण झाले. 'भक्तीशक्तीच्या गुढी उभारू, जोवर वाहते गोदामाय, जोवर वाहते कृष्णामाय, तोवर गीत जिजाऊचे गाऊ' असेच जिजाऊंचे गीत महाराष्ट्र गात राहील यात शंका नाही.

– डॉ. वि. ल. धारूरकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT