Latest

आईची महती : किडनी देऊन मुलीला दिलं जीवदान!

अंजली राऊत

जळगाव : नरेंद्र पाटील
आई मुलीला जन्मच देत नाही तर जीवदानही देते याचे मूर्तीमंत उदाहरण भुसावळ येथे पाहायला मिळाले. मुलीच्या भविष्याचा विचार करणाऱ्या संगीता अशोक सोनवणे या मातेने एका मुलीला जन्म दिला. ज्यावेळी आपल्या लेकरावर कठीण प्रसंग येतो, त्यावेळी आपला जीवही धोक्यात घालायला 'आई' मागेपुढे पाहत नाही. मुलीची किडनी फेल झाल्याने तिला होणाऱ्या वेदना आणि डायलेसिसच्या वेळी होणारा त्रास या सर्व समस्यांतून सोडवण्यासाठी आई-वडिलांनी कसोशीने प्रयत्न केले. अखेर किडनीची आवश्यकता भासत असताना आईच्या मातृत्वाचा झरा वाहीला आणि तिने मुलीला किडनी देऊन जीवदान दिलं आहे. आई व मुलगी दोघी स्वस्थ असून मुलीला संकटातून सोडवून जीवदान देणाऱ्या या आईला सर्वत्र साजरा होत असलेल्या महिला दिनानिमित्तही मानाचा मुजरा!

आई हा शब्द सर्व दुःखांवरचा एक रामबाण असे औषध आहे. या औषधाचा जगभरात प्रत्येक जण उपयोग करत असतो. भुसावळ येथील संगीता अशोक सोनवणे या मातेने मुलीच्या 26 व्या वर्षी स्वत:ची  किडनी देऊन पुन्हा जीवदान देत नवीन जन्म दिला आहे. भुसावळ या शहरातील झेटीएस भागात राहणारे अशोक भगवान सोनवणे व संगीता अशोक सोनवणे या सर्वसामान्य कुटुंबाच्या वेलीवर दोन सुंदर फुले फुलली एक पूजा व दुसरा धीरज हे दोन अपत्य आहेत.

पूजा हिने ग्रॅज्युएशन पूर्ण करून एमए पर्यंत शिक्षण घेतले असून स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत आहे. तिला अचानक पोटाचा त्रास जाणवू लागल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय निदानामध्ये पूजाच्या किडन्या फेल झाल्याचे निष्पन्न झाले. किडन्या ट्रान्सफर करावे लागतील असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यासाठी मुंबईच्या केईएम हॉस्पिटलला जाण्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र हलाखीची आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईला नेणे शक्य न्वहते. त्यामुळे जळगाव येथेच पूजावर डायलिसिस सुरु करण्यात आले. त्यासाठी मित्र परिवाराने आर्थिक सहाय्यही केले. परंतु स्थानिक उपचार पुरेसे पडत नसल्याने शेवटी पूजाच्या पालकांनी तिला केईएम हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार करण्यास सुरू केले. येथील डॉक्टर श्रेयशी बोसे, डॉक्टर तुकराम् जमाले व डॉक्टर प्रतिक यांना पूजावर ट्रीटमेंट सुरु केली. एक वर्षाच्या ट्रीटमेन्टनंतर किडनी मॅच करण्यात आली. यामध्ये आईची किडनी मॅच झाल्यामुळे मुलीला पुन्हा जीवदान देण्यासाठी आई तयार झाली व आपल्या मुलीला वाचवण्यासाठी या आईने बुधवार, दि. 6 फेब्रुवारी 2024 ला मुलीला किडनी देऊन तिला वाचवत जगण्याचे बळ दिले आहे. (Organ donate)

SCROLL FOR NEXT