Latest

मातृत्व अन् कर्तव्यही जिंकले! १० महिन्यांच्या तान्हुल्याला पतीकडे सोपवून बीएसएफ जवान वर्षा पाटील-मगदूम ड्युटीवर रवाना (Video)

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  आपला पोटचा गोळा म्हणजे आईसाठी सर्वस्वच. त्यात ते तान्हुले असले, तर त्यावरून आईची क्षणभरसुद्धा नजर हटत नाही. आपल्या बाळासाठी सर्वस्व पणाला लावणार्‍या आईची अनेक उदाहरणे हजारो वर्षांपासून सांगितली जातात. यामध्ये मातृत्वाचा विजय होतो. बुधवारी रात्री मात्र कोल्हापूर रेल्वे स्थानकावर माय-लेकराच्या गहिवरात मातृत्वही जिंकलं आणि कर्तव्यही. अवघ्या दहा महिन्यांच्या तान्हुल्याला वडिलांकडे सोपवून त्याच्यापासून हजार-दीड हजार किलोमीटर दूरवर बाडमेर (राजस्थान) येथे सीमा सुरक्षा दलात आई कर्तव्यासाठी रवाना झाली.

दर्‍याचे वडगाव (ता. करवीर) येथील वर्षा पाटील-मगदूम ही आई आणि दहा महिन्यांचा दक्ष यांच्या रेल्वेस्थानकावरील ताटातुटीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. गुरुवारी दिवसभर सर्वत्र त्याचीच चर्चा होती. मातृत्वाबरोबरच कर्तव्याला प्राधान्य देणार्‍या वर्षावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नंदगाव येथील वर्षा पाटील यांचा विवाह दर्‍याचे वडगाव येथील रमेश शिवाजी मगदूम यांच्याशी झाला आहे. सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या वर्षा सुट्टीवर होत्या. सुट्टी संपवून कर्तव्यासाठी रवाना होताना आपल्या दहा महिन्यांच्या चिमुकल्याच्या विरहाने वर्षा यांचे मातृत्व अडवे आले. जसजशी गाडी सुटण्याची वेळ जवळ आली तशी मायलेकांची घालमेल वाढली. आईच्या विरहाची पुसटशी कल्पनाही नसलेल्या 'दक्ष'चा निरागस चेहरा पाहताना वर्षा यांच्या अश्रूंचा बांध फुटला. उपस्थितांनाही गहिवरून आले.

दरवाज्यात उभारलेली आई आणि वडिलांच्या कुशीत विसावलेला तान्हुला हे द़ृश्य निःशब्द होते. मनाला भिडणारा असा हा क्षण पाहणार्‍या उपस्थितांनाही अश्रू रोखता आले नाहीत. गाडीची शिट्टी वाजली, गाडी सुरू झाली, ती जसजशी पुढे जाऊ लागली तसा सार्‍यांच्याच अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यात स्वत:ला सावरत वर्षा यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि मातृत्वाबरोबरच कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवले.

SCROLL FOR NEXT