Latest

४ मुलांच्या हत्येप्रकरणी आई २० वर्षे जेलमध्ये, आता निर्दोष!

Arun Patil

कॅनबेरा, वृत्तसंस्था : पोटच्या 4 लेकरांच्या (नवजात) हत्येप्रकरणी 20 वर्षांचा कारावास भोगलेली आणि ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात वाईट आई म्हणून कुख्यात झालेली कॅथलीन फोलबिग अखेर निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. न्यू साऊथ वेल्सच्या न्यायालयाने हा निकाल दिला. कॅथलीनचे निर्दोषत्व विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे सिद्ध होऊ शकले, हे येथे विशेष…

कॅथलीन हिने 1989-1999 दरम्यान कॅलेब, पॅट्रिक, सारा आणि लॉरा या स्वत:च्या अपत्यांची हत्या केली, असा सरकार पक्षाचा आरोप होता. सर्व अपत्यांचे वय ते मरण पावले, त्या दिवशी 19 दिवस ते 18 महिन्यांच्या दरम्यान होते. कॅथलीननेच या मुलांची हत्या केली, असा तपासाचा निष्कर्ष होता. पती क्रेग यानेही कॅथलीनला फारकत दिली. 2003 मध्ये कॅथलीनला 40 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. नंतर ती कमी करण्यात आली, हा भाग अलाहिदा.

आजअखेर तिने 20 वर्षांचा तुरुंगवास भोगला आहे. आता न्यायालयाने तिच्यावरील सर्व खटले रद्दबातल केले आहेत. गळा आवळून तिने मुलांना मारले, या आरोपासह पुरावा म्हणून तिची एक डायरी तपासाधिकार्‍यांनी न्यायालयात सादर केली होती. डायरी कुठल्याही मानसशास्त्रज्ञाने वा मानसोपचार तज्ज्ञाने तपासलेली नव्हती. डायरीतील काही वाक्यांच्या आधारे कॅथलीनचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याचा दावाही करण्यात आला होता. वर्षभरापूर्वी नव्याने केलेल्या तपासणीतील वैज्ञानिक निष्कर्षातून सर्व मुलांचा मृत्यू दुर्मीळ जनुकीय उत्परिवर्तनामुळे झाल्याचे समोर आले. यात स्वत: कॅथलीनचीही जनुकीय तपासणी झाल्याचे सांगण्यात येते.

या निकालामुळे जगातील सर्वात वाईट आई हा माझ्यावरचा कलंक पुसला गेल्याचा जेवढा आनंद मला आहे, तेवढे स्वत:च्या लेकरांच्या खुनात 20 वर्षे कारावास भोगून झाल्याचे दु:ख नक्कीच नाही.
– कॅथलीन फोलबिग, कॅनबेरा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT