पुढारी ऑनलाईन: वायव्य भारतातील काही भागांतून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून, येत्या तीन दिवसातच मान्सून माघारी परतणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी सांगितले की, नैऋत्य मान्सूनची माघार ही पुढील आठवड्याच्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे.
भारताच्या उत्तर-पश्चिम भागात चक्रीवादळविरोधी प्रवाह निर्माण झाल्याने कमी उष्णकटिबंधीय पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत पश्चिम राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे कोरडे हवामान राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
यावर्षी, जून वगळता संपूर्ण हंगामात देशात मुसळधार पाऊस झाला. 17 सप्टेंबरपर्यंत इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, दिल्ली, पंजाब, त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूर या आठ राज्यांमध्ये कमी पावसाची नोंद झाली आहे. देशातील प्रमुख भौगोलिक भागात सामान्य पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 17 सप्टेंबर दरम्यान, संपूर्ण भारतात 865.4 मिमी पाऊस पडला असून, जो सामान्य पावसापेक्षा 7 टक्के जास्त होता. भारतात नैऋत्य मान्सून हा जून ते सप्टेंबर या कालावधीत सक्रीय असतो. देशातील खरीप पिके, पाण्याचे साठे आणि अर्थव्यवस्थेसाठी मान्सून महत्त्वाचा आहे. यंदाच्या या मान्सूनच्या चार महिन्यात देशात वार्षिक 70 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला.