Latest

Monsoon sessions : अधिवेशनात सरकारला सळो की पळो करून सोडू; विरोधी पक्षांचा इशारा

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्तार आणि आमदारांना सांभाळण्यात मश्गुल आहे. या सरकारकडे विकासकामांसाठी वेळ नाही. राजकीय पक्षात फूट पाडून हे सरकार उभे आहे. त्यामुळे आमच्या संख्येवर जाऊ नका, राज्यातील विरोधक एकसंध आहेत. पावसाळी अधिवेशनात या सरकारला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षांनी रविवारी सत्ताधार्‍यांना दिला. कलंकित सरकारच्या चहापानात स्वारस्य नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर त्यांनी बहिष्कार टाकला.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक विधान भवनात पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. अशोक चव्हाण, भाई जगताप, सुनील प्रभू, अभिजित वंजारी आदी नेते यावेळी उपस्थित होते. शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे विधिमंडळातील विरोधकांची संख्या रोडावली आहे. विरोधी पक्षनेतेपदाबाबतही अद्याप संभ्रमाची स्थिती आहे. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांची कामगिरी कशी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर आमच्या संख्याबळावर जाऊ नका, आमची संख्या कमी असली तरी सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा विरोधकांनी दिला.

अंबादास दानवे म्हणाले, हे सरकार घटनाबाह्य आणि कलंकित आहे. विकासासाठी या सरकारकडे वेळच नाही. शेतकरी, महिला, युवाविरोधी सरकारने शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र कलंकित करण्याचे काम केले आहे. फोडाफोडीच्या राजकारणात विकास मागे पडतो आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. राजकीय पक्षात फूट पाडून सरकार उभे असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

SCROLL FOR NEXT