Latest

Mohit Sharma : आयपीएलमधून 2 वर्षे बाहेर राहिला, पण पुनरागमन करताच खळबळ उडवून दिली

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या (IPL) या सीझनमध्ये असे अनेक खेळाडू दिसत आहेत, जे गेल्या काही वर्षांपासून आयपीएल खेळत नव्हते. गुजरात टायटन्सकडून खेळणारा मोहित शर्मा (Mohit Sharma) हा याच यादीतील एक खेळाडू आहे, जो एकेकाळी कुणी खरेदीदार न मिळाल्याने सलग दोन वर्षे आयपीएलला मुकला होता. पण 2023 मध्ये त्याने पुनरागमन करताच खळबळ उडवून दिली आहे. यंदाच्याही हंगामात तो पर्पल कॅपच्या शर्यतीत दिसत आहे.

मोहितचे 2013 मध्ये आयपीएल पदार्पण

मोहित शर्माने (Mohit Sharma) 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने आपल्या संघासाठी 15 सामने खेळले आणि 20 विकेट मिळवल्या. यानंतर तो वर्षानुवर्षे आयपीएलमध्ये दिसला. 2018 पर्यंत सर्व काही ठीक चालले. पण 2019 मध्ये परिस्थिती बदलली. त्यावर्षी तो आपल्या संघासाठी एकच सामना खेळला. ज्यात त्याला एकच विकेट मिळाली. 2020 हे वर्षही असेच गेले. त्यावर्षीही त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळीही त्याला एकच बळी मिळाला. मात्र त्यानंतर कोणत्याही संघाने त्याला घेण्यास स्वारस्य दाखवले नाही. 2021 आणि त्यानंतर 2022 मध्ये तो आयपीएल खेळू शकला नाही. एकाही फ्रँचायझीने त्याला लिलावात खरेदी केले नाही.

मोहित शर्मा नेट बॉलर बनला

मोहित (Mohit Sharma) आयपीएल (IPL) खेळत नव्हता आणि टीम इंडियात परतण्याची शक्यताही दिसत नव्हती. अशा परिस्थितीत त्याने नेट बॉलर म्हणून पुनरागमन केले. तो गुजरात टायटन्समध्ये सामील झाला आणि त्यांच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करत राहिला. टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूवर नेट बॉलर होण्याची वेळ आली होती. पण टॅलेंट असेल तर दिवस बदलतात असं म्हणतात. असेच काहीसे मोहित शर्माच्या बाबतीत घडले. नेटमध्ये त्याची चमकदार गोलंदाजी पाहून जीटीने त्याचा संघात समावेश केला.

मोहितचे 2023 मध्ये पुनरागमन

दोन वर्षांनंतर मोहित शर्मा 2023 साली पुन्हा एकदा आयपीएल खेळला. गेल्या वर्षी त्याने आपल्या संघासाठी 14 सामने खेळले आणि या काळात त्याने 27 बळी घेतले. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हे सर्वोत्तम वर्ष ठरले. त्याचा संघ अंतिम फेरीत पोहोचला, त्यात मोहित शर्माचीही मोठी भूमिका राहिली. यानंतर संघाने त्याला 2024 च्या हंगामासाठी कायम ठेवले. तो यंदाच्याही आयपीएलमध्ये (IPL 2024) खेळत आहे. जीटीने आतापर्यंत खेळलेल्या सर्व 3 सामन्यांमध्ये तो खेळताना दिसला. या कालावधीत त्याने आतापर्यंत 6 विकेट्स घेतल्या आहेत. भविष्यातही ते आणखी चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे.

पर्पल कॅप शर्यतीत मोहित टॉप 5 मध्ये

विशेष बाब म्हणजे जगभरातील सर्वोत्तम खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असताना भारतीय गोलंदाज मोहित शर्मा हा पर्पल कॅप जिंकण्याचा दावेदार असल्याचे दिसत आहे. यावेळी, सीएसकेच्या मुस्तफिजुर रहमानने आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत, परंतु मोहित हा देखील टॉप 5 मध्ये कायम आहे. रहमाननंतर मयंक यादव 6 विकेट्ससह दुस-या, युझवेंद्र चहल 6 विकेट्ससह तिसऱ्या आणि मोहित शर्मा 6 विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT