Latest

Moeen Ali Retirement : ब्रॉडनंतर अष्टपैलू मोईन अलीही निवृत्त

Arun Patil

लंडन, वृत्तसंस्था : जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनंतर आता इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीनेदेखील (Moeen Ali Retirement) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ओव्हल कसोटी सामना झाल्यानंतर मोईन अलीने कसोटीतील हा आपला शेवटचा सामना असेल, असे जाहीर केले. जर स्टोक्सने पुन्हा संघात परतण्याचा आणखी एक मेसेज पाठवला तर तो यावेळी मी डिलिट करेन, असे तो गमतीने म्हणाला.

यापूर्वी, मोईन अलीने 2021 मध्येच कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, डावखुरा फिरकीपटू जॅक लीच दुखापतीमुळे अचानक बाहेर फेकला गेल्यानंतर मोईन अलीला निवृत्ती मागे घेत संघात परत यावे लागले होते. त्यावेळी इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स व मुख्य प्रशिक्षक ब्रेन्डॉन मॅक्युलम यांनी त्यावेळी मोईन अलीचे मन वळवले होते.

'मी माझा निर्णय त्यावेळी फिरवला आणि संघात परत आलो, याचा मला आनंद आहे. ब्रॉड, अँडरसन, स्टोक्स या सर्व संघ सहकार्‍यांसमवेत पुन्हा खेळण्याचा अनुभव खूप मोलाचा ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून सांगता करता आली, याचाही आनंद वाटतो,' असे मोईन अली 'बीबीसी'शी बोलताना म्हणाला.

मोईन अलीने यापूर्वी पुनरागमन केले, त्यावेळी इंग्लिश संघासाठीही त्याची उपलब्धता विशेष महत्त्वाची होती. मोईन अली आघाडीचा फिरकीपटू राहिला. शिवाय, तिसर्‍या स्थानी फलंदाजीला उतरत त्याने सातत्यपूर्ण योगदानही दिले. अष्टपैलू योगदान देण्याच्या क्षमतेमुळे इंग्लंडच्या आघाडीच्या खेळाडूंत त्याचा उल्लेख होत राहिला.

वास्तविक, यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेत मोईन अली सहभागी होऊ शकेल का, याबद्दल साशंकता होती. त्यातच, पहिल्या कसोटीत बोटाच्या दुखापतीने त्याच्या अडचणीत आणखी भर पडली; पण यानंतरही त्याने पूर्ण तंदुरुस्तीसह मैदानात उतरून संघास पुरेपूर योगदान दिले.
इंग्लंडने ओव्हलमधील शेवटची कसोटी 49 धावांनी जिंकत अ‍ॅशेस मालिका बरोबरीत आणली. मोईन अलीने 3,094 धावा व 204 बळींसह आपल्या कसोटी कारकिर्दीची सांगता केली. इंग्लंडला या मालिकेत 2-2 अशी बरोबरी मिळवून देण्यात त्याचाही मोलाचा वाटा राहिला.

मोईन अलीचे कसोटी क्रिकेटमधील योगदान (Moeen Ali Retirement)

सामने : 68
धावा : 3,094 बळी : 204
सरासरी : 28.12 सरासरी : 37.31
सर्वोच्च : 155 नाबाद डावात सर्वोत्तम : 6-53
शतके : 5 सामन्यात सर्वोत्तम 10-112
अर्धशतके : 15 डावात 5 बळी : 5 वेळा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT