Latest

आता मोबाईल फोन करणार त्वचेच्या कर्करोगाचे निदान

Arun Patil

मेलबोर्न : कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचे निदान वेळेत झाले तर त्यावर यशस्वी उपचार करणे शक्य होऊ शकते. त्यासाठी आता अनेक नवी नवी साधने व परीक्षणेही विकसित होत आहेत. आता तर चक्क मोबाईलच्या माध्यमातून त्वचेचा कर्करोग आहे की नाही, याची माहितीही मिळू शकणार आहे. त्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीची मदत घेतली जात आहे. स्मार्टफोन कॅमेर्‍याची एक अशी लेन्स तयार करण्यात आली आहे जी जन्मखुणा किंवा त्वचेवरील इतर कोणत्याही प्रकारचे व्रण, खुणा यांचे तपशीलवार फोटो घेऊ शकेल. त्याद्वारे बायोलॉजिकल सेल्स (जैविक पेशींची) तपासणी केली जाणार असून त्वचेचा कर्करोग शोधता येईल. ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न विद्यापीठाच्या संशोधकांनी फेज इमेजिंगसाठी नॅनोमीटर विकसित केले आहे.

नॅनो टेक्नॉलॉजी किंवा नॅनोटेक तंत्रज्ञानात एखाद्या पदार्थाला सुपरमॉलिक्युअर स्तरावर परिवर्तित केले जाते. त्यामुळे पदार्थातील प्रॉपर्टी बदलतात. यामुळे इलेक्ट्रॉनिक्सपासून कपड्यांपर्यंत, क्रीडा उपकरणांपासून सौंदर्य उत्पादनांपर्यंत आणि वैद्यकीय शास्त्रापर्यंत सर्व काही बदलत चालले आहे. कोणत्याही प्रकारचा आजार शोधण्यासाठी, ऑप्टिकल मायक्रोस्कोपद्वारे बायोलॉजिकल सेल्सची तपासणी करणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण यात होणारे बदल हे अनेकदा रोगांचे संकेत किंवा लक्षणे असतात; पण या पेशी सहजासहजी दिसत नाहीत.

पेशींचे काही भाग पारदर्शक किंवा जवळजवळ अद़ृश्य असतात. ते पाहण्यासाठी फेज इमेजिंग प्रक्रिया वापरली जाते. फेज इमेजिंगद्वारे पेशीमधून जाणार्‍या प्रकाशाचे विश्लेषण केले जाते. त्यामध्ये पेशीच्या पारदर्शक भागाशी संबंधित माहिती असते. नंतर ते अगदी सहजपणे पाहता येते. या प्रक्रियेसाठी आतापर्यंत महागडी उपकरणे वापरली जात होती; पण आता ही प्रक्रिया नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बदलण्यात आली आहे. त्यासाठी एक नॅनोमीटर तयार करण्यात आले आहे. ते अतिशय पातळ आणि लेन्ससारखे दिसते. फोनच्या कॅमेर्‍यात ते सहज लावता येऊ शकते.

फोनच्या कॅमेर्‍याला जोडल्यास काढलेल्या छायाचित्रांचे बारकावे, सेलच्या पारदर्शक भागाशी संबंधित माहिती मिळेल. त्याच्या मदतीने त्वचेच्या कर्करोगाविषयी माहिती मिळेल. विशेष म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने त्वचेचा कर्करोग दूर करू शकणारी पट्टी विकसित केली आहे. ही पट्टी चुंबकीय नॅनोफायबरपासून तयार केली जाते. ती त्वचेच्या कर्करोगाच्या पेशींना गरम करून नष्ट करू शकते. सध्या त्वचेच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपीद्वारे उपचार केले जातात.

SCROLL FOR NEXT