Latest

सोन्यासारख्या जमिनी विकू नका : राज ठाकरे

Arun Patil

रोहे, पुढारी वृत्तसेवा : गेली कित्येक वर्षे तुम्ही आमदार व खासदार निवडून दिले; पण तुमच्या यातना संपत नाहीत. आता जागे व्हा. ते आपल्या जमिनी चिरीमिरी किमतीत घेत आहेत. रस्ता झाल्यावर 100 टक्के किमतीने जागा विकतील. आज कुंपणच शेत खात आहे. आपलेच लोक जमिनी घेत आहेत. तेव्हा जागे व्हा, जमिनी विकू नका, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलाड येथील सभेत कोकणवासीयांना केले.

मनसेच्या कोकण जागर पदयात्रेच्या समारोप प्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी आ. राजू पाटील, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आदी उपस्थित होते.

मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाली आहे. सारखी निविदा काढायची, कंत्राटे द्यायची हे वर्षांनुवर्षे सुरू आहे. असा संतापही राज ठाकरे यांनी व्यक्त केला. संदीप देशपांडे म्हणाले, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण गणपती उत्सवापर्यंत सिंगल लेन तयार होईल, असे सांगतात. तसे झाले तर घरी जाऊन त्यांचा सत्कार करू; पण नाही झाले तर कोकणी माणूस तुम्हाला कोकणात फिरू देणार नाही.

महामार्गाबाबत मनसे आक्रमक

चिपळूण/लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे महामार्गावर प्रवास करणार्‍या अनेकांना प्राण गमवावे लागले. या अनुषंगाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेतर्फे परशुराम ते चिपळूण पाग नाक्यापर्यंत जागर पदयात्रा काढण्यात आली. यावेळी खड्ड्यांवरून मनसे नेते आक्रमक झाले होते. मनसैनिकांनी जोरदार घोषणा देऊन महामार्ग परिसर दणाणून सोडला. या पदयात्रेत बैलगाडी, चांद्रयान सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. चिपळूणनंतर पुढे रत्नागिरी तालुका मनसेने निवळी ते वांद्री अशी पदयात्रा काढली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनी जागर पदयात्रेची घोषणा केली. रविवारी रायगडमधून पदयात्रा सुरू झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT