Latest

Raj Thackeray : मनसैनिकांनी शहाणपणा करू नये, राज ठाकरेंच्या कडक सूचना

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याला विराट सभा घेतली. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी हिंदूत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत 5 जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी ही घोषणा केल्यापासून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे. विविध नेते मंडळींकडून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली आहे. तर मनसेच्या काही नेते मंडळींसह पदाधिकाऱ्यांकडूनही अयोध्या दौऱ्यावरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ८) राज ठाकरे यांनी कडक शब्दांत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना केली आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी… माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत, ते याबाबत बोलतील. इतर कोणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये."
तसेच "इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे. जय महाराष्ट्र!" असं म्हणत राज ठाकरे यांनी सर्वच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कडक सूचना दिली आहे.

राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा मुद्द्यावरून राज्यसह देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यंदाच्या गुढीपाडव्यापासून त्यांनी राज्यात तीन सभा घेतल्या. यात त्यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राज यांच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. तसेच या दौऱ्यासाठी मनसेकडून रेल्वेचे बुकिंग देखील करण्यात आले असून राज्यभरातील मनसैनिक राज ठाकरेंसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

दरम्यान, मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनीही अश्याच आशयाचे व पदाधिकाऱयांना जीभेवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना करण्याचे पत्रक काढले आहे.

या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, पक्षाची अधिकृत भूमिका समाजमाध्यमांत मांडण्याचे काम पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रवक्ते करत असतात. त्यामुळे पक्षाच्या राजकीय भूमिकांबाबत पक्षातील इतर कोणीही माध्यमांसमोर बोलू नये. पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांवर वा अन्य कोठेही टीकाटिप्पणी करताना भाषेचे भान बाळगावे, अशीही सूचना सरदेसाई यांनी पत्रात दिली आहे.


राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर वाद सुरू असून उत्तर प्रदेशमधील भाजपच्या खासदारांनी राज ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला आहे. त्यावर मनसेतील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता असल्याने मनसे नेत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया या अडचणीच्या ठरु शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच राज ठाकरेंनी हे पत्र जारी केल्याचंहीबोललं जातंय.

SCROLL FOR NEXT