Latest

ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरू शकतात!

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भलेही उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविले नसले, तरी त्यांच्या गटातील आमदारांवर अपात्रतेची तलवार टांगती राहील, असे मत सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्तकेले आहे. शिंदे गट आता केव्हाही ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करू शकतो. त्यामुळे अपात्रतेपासून वाचण्यासाठी त्यांना शिंदे गटात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मतही शिंदे यांनी नोंदविलेे.

नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा आणि भरत गोगावले हे या शिवसेनेचे प्रतोद असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे प्रतोद या नात्याने गोगावले हे नोटीस काढून शिंदे गटाच्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश ठाकरे गटातील आमदारांना देऊ शकतात. अशा बैठकीस ठाकरे गटाचे आमदार गैरहजर राहिले, तर त्यांना ते अपात्र करू शकतात. हे टाळायचे असेल, तर ठाकरे गटातील आमदारांना शिंदे गटात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे मतही शिंदे यांनी या निकालावर बोलताना व्यक्त केले. शिंदे गटाने अपात्र ठरविले, तर त्या अपात्रतेला सर्वोच्च न्यायालयात लगेच स्थगिती मिळण्याची शक्यताही कमीच आहे.
निकालाला वर्षही लागू शकते

नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात लगेच आव्हान देईल. मात्र, याप्रकरणी निकाल लागण्यास किमान एक वर्ष लागेल, अशी शक्यताही विधिज्ञ शिंदे यांनी वर्तवली. ठाकरे गटातील आमदारांना अपात्र ठरविले असते, तर कदाचित न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला स्थगिती दिली असती. मात्र, नार्वेकरांनी जवळपास निवडणूक आयोगाने दिला तसाच निकाल देत पक्ष हा शिंदे यांचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निर्णयाला लगेच स्थगितीही मिळण्याची शक्यता नाही.

…तर न्यायालयाचा निकाल दिशादर्शक ठरेल

ठाकरे गटाने आव्हान याचिका दाखल केल्यावर न्यायालय विधानसभा अध्यक्षांसह सर्वसंबंधितांना नोटिसा जारी करेल. त्यानंतर सर्वांची लिखित उत्तरे, पूरक उत्तरे, खुलासे आणि युक्तिवाद यात सहज 8 ते 10 महिने जातील. त्यामुळे याप्रकरणी निकाल येण्यास किमान एक वर्ष लागेल. या काळात लोकसभा व राज्यातील विधानसभा निवडणुका होऊनही जातील. त्यामुळे हा निकाल महाराष्ट्रासाठी उशिरा येणार असला, तरी देशासाठी तो दिशादर्शक असेल. अशाप्रकारची राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यास नेमके काय करायला हवे, याचे मार्गदर्शन या निकालाने होईल, असेही ते म्हणाले. या निकालाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट जनतेची सहानुभूती मिळवू शकतो. जनता लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या बाजूने मतही देऊ शकते, अशी शक्यताही शिंदे यांनी वर्तविली.

SCROLL FOR NEXT