Latest

आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार; सुनावणीत जाणार तीन महिने

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेसंदर्भात पुढच्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात करणार आहेत. मात्र ते दररोज एका आमदाराला सुनावणीसाठी वेळ देणार असल्याने या सुनावणीला दोन-तीन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. परिणामी अपात्रतेचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

शिंदे गटातील 40 आणि ठाकरे गटातील 14 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर दोन्ही गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाला आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी आपले म्हणणे सादर केले असले तरी शिंदे गटाच्या आमदारांनी पावसाळी अधिवेशनाचे कारण सांगत वेळ वाढवून मागितली आहे. त्यांनी अधिवेशन संपले तरी आपले म्हणणे सादर केलेले नाही.

मात्र, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे आमदारांच्या सुनावणीला येत्या आठवडाभरात सुरुवात करणार आहेत. पहिल्यांदा ठाकरे गटाच्या आमदारांचे म्हणणे ते एकूण घेणार आहेत. परंतु, ते दररोज एका आमदाराला वेळ देणार आहेत. आमदारांची संख्या आणि सुट्ट्यांचा विचार केला तर ही सुनावणी पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा तरी कालावधी लागणार आहे. त्यामुळे अपात्रतेच्या मुद्यावर अध्यक्षांचा निर्णय येण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT