Latest

Maharashtra Politics | आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी एकत्रित की स्वतंत्र? राहुल नार्वेकरांचा आज फैसला

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आमदार अपात्रताप्रकरणी ज्या वेळापत्रकामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा रोष ओढवून घेतला आहे, त्या वेळापत्रकानुसार ते या प्रकरणातील पहिला निकाल शुक्रवारी देणार आहेत. या प्रकरणाची सुनावणी एकत्रित द्यायची की स्वतंत्रपणे, याबाबतचा हा फैसला असणार आहे. (Maharashtra Politics)

नार्वेकर विधान भवनात आमदार अपात्रता याचिकांवर पुढील सुनावणी घेणार आहेत. शिवसेनेच्या 54 आमदारांच्या अपात्रतेसंबंधीच्या 34 याचिकांची एकत्रित सुनावणी घ्यायची की स्वतंत्रपणे, याबाबत आतापर्यंत झालेले युक्तिवाद व सादर कागदपत्रांच्या आधारे अध्यक्ष आपला निर्णय घेणार आहेत. यापूर्वी 12 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती. यावेळी ठाकरे गटाने सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्याची मागणी केली होती. एकाच विषयावरच्या याचिका असल्याचा दावा केला होता; तर प्रत्येक आमदाराचे म्हणणे वेगवेगळे असल्याने स्वतंत्र सुनावणी घ्यावी, असा मुद्दा शिंदे गटाने मांडला होता. यावेळी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यावर नार्वेकर यांनी वेळापत्रकानुसार 20 ऑक्टोबर रोजी याबाबत निर्णय घेण्याचे जाहीर केले होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे नव्याने अर्ज दाखल करून अतिरिक्त माहिती आमदारांना नव्याने सादर करायची असल्याचे कळविले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने 30 ऑक्टोबरपर्यंत नवे वेळापत्रक देण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांना केल्या आहेत. त्यासंदर्भात नार्वेकर हे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचा सल्ला घेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. शुक्रवारच्या निकालानंतर किती दिवसांचे वेळापत्रक असेल याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. (Maharashtra Politics)

SCROLL FOR NEXT