Latest

अपात्रता सुनावणी फेब्रुवारीपर्यंत

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिरंगाई करत असल्याचा आक्षेप नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला असला, तरी ही सुनावणी 2024 च्या फेब्रुवारीपर्यंत चालेल, असे स्पष्ट संकेत आहेत.

शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यायची की, वेगवेगळी यावर राखून ठेवलेला निर्णय नार्वेकर यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला असून, सर्व 34 याचिकांची सहा गटांत वर्गवारी करण्यात येणार आहे. आता पुढील सुनावणी गुरुवारी (26 ऑक्टोबर) होईल.

34 याचिका सहा गटांत विभागण्यात आल्या असून, यात ठाकरे गटाने दाखल केलेल्या यात 1 ते 16 याचिकांचा एक गट करण्यात आला आहे. दुसर्‍या गटात 17 क्रमांकाची याचिका असून, यात तीन अपक्ष आमदारांच्या अपात्रतेसंबंधीची मागणी आहे. तर, 18 क्रमांकाच्या याचिकेत शिंदे गटात सामील झालेल्या 22 आमदारांच्या अपात्रतेसंबंधी मागणी करणार्‍या याचिकेचा समावेश आहे.

चौथ्या गटातील 20 क्रमांकाची याचिका ही शिंदे गटाचे व्हीप भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या व्हिपच्या विरोधात केलेली याचिका आहे. सहाव्या गटात 20 ते 34 क्रमांकाच्या याचिका एकत्र करण्यात आल्या आहेत, यात ठाकरे गटाने शिंदे गटाच्या व्हिपच्या विरोधात केलेली याचिका अंतर्भूत करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते (ठाकरे गट) अनिल परब यांनी दिली.

प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घेण्याची शिंदे गटाची मागणी होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेसंदर्भात दाखल झालेल्या सर्व 34 याचिका सहा गटात एकत्रित करून पुढील सुनावणी घेण्याचा आपला निर्णय शुक्रवारी दिला. येत्या 26 तारखेला सर्व सहा गटांतील याचिकांचे युक्तिवादाचे मुद्दे निश्चित करून सुनावणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

शिंदे गटाची मागणी मान्य

आम्ही सादर केलेली प्रतिज्ञापत्रे ग्राह्य धरावीत ही शिंदे गटाची मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली. तसेच, शिंदे गटाकडून काही कागदपत्रे मिळावीत, अशी मागणी करणारा अर्ज ठाकरे गटाने केला. त्यावर, सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे आपल्यासमोर सादर करावीत, असे निर्देश अध्यक्षांनी शिंदे आणि ठाकरे गटाला दिले. याप्रकरणी दोन्ही गटांना 25 ऑक्टोबरपर्यंत आपले मत मांडण्याची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजच्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून दाखल केल्या जाणार्‍या नवनव्या अर्जांबद्दल नाराजी व्यक्त केली. नव्या अर्जांमुळे वेळ जातो. इथे एक भूमिका आणि सर्वोच्य न्यायालयात वेगळी भूमिका का घेता, असा सवाल राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला केला. जर मी सुनावणी घेत आहे.

अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 34 याचिका 6 गटांत विभागण्यात आल्या असल्या, तरी चार ते पाच गटांत त्यांची सुनावणीदेखील कमी वेळ खाणारी नसेल. त्यातही पक्षबैठकीला हजर राहिले नाही म्हणून अपात्र ठरवल्याची याचिका, पक्षादेश डावलला म्हणून दाखल झालेली याचिका एकत्र सुनावणीस येऊ शकतात. तरीही ही संपूर्ण सुनावणी याचिका पूर्ण होण्यास पुढील वर्षीचा फेब्रुवारी महिना उजाडू शकतो.

…तर दोन आठवड्यांत सुनावणी पूर्ण होईल ः परब

सहा गटांतील या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष दोन आठवड्यांत सुनावणी पूर्ण करू शकतात. या प्रकरणात न्यायालयात जसा नियमित खटला चालतो, तसा खटला चालवण्याची गरज नाही. आमच्या याचिका या मान्य केलेल्या वस्तुस्थिती, पुरावे आणि कागदपत्रांवर आधारित आहेत. शिंदे गटाने आम्हाला पक्षादेश मिळाला नसल्याचा दावा केला. तो खोडून काढण्यासाठी मेलच्या माध्यमातून त्यांना पाठवलेला पक्षादेश आम्ही पुरावे म्हणून सादर केला आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोरही बाजू मांडणार आहोत, असे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT