Latest

Mizoram Assembly Election : मिझोराममध्ये 174 पैकी 114 उमेदवार कोट्यधीश!

दिनेश चोरगे

मिझोराममध्ये विधानसभेच्या 40 जागांसाठी 174 उमेदवार रिंगणात असून, त्यातील तब्बल 114 उमेदवार कोट्यधीश आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या त्या तुलनेत नगण्य म्हणजे केवळ सात इतकी आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार 174 पैकी 67 उमेदवार राष्ट्रीय पक्षाचे आहेत तर 40 उमेदवार प्रादेशिक पक्षाचे आहेत. याशिवाय 40 उमेदवार अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे आहेत तर 27 उमेदवार अपक्ष आहेत.

2018 च्या निवडणुकीचा विचार केला तर त्यावेळी 209 उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यातील 9 उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. भाजपचे लाँग्ताई मतदारसंघाचे उमेदवार जे. बी. रुआलचुंगा हे यावेळचे सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांची संपत्ती 90.32 कोटी रुपये इतकी आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसचे सर्चिपचे उमेदवार आर. वांतालुंगा हे 55.63 कोटींच्या संपत्तीसह दुसर्‍या तर मिझोराम पीपल्स मूव्हमेंटचे एच. गिंझाला हे 36 कोटींच्या संपत्तीसह तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

पहिल्यांदाच ब्रू शरणार्थी मतदानापासून दूर…

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच ब्रू शरणार्थी मतदान करणार नाहीत. याचे कारण म्हणजे त्रिपुरात स्थायिक झालेल्या ब्रू लोकांना तेथील सरकारने दिलेले नागरिकत्व हे आहे. केंद्र सरकारच्या पुनर्वसन योजनेनुसार 2020 साली ब्रू लोकांचे पुनर्वसन त्रिपुरामध्ये करण्यात आले होते. विशेष म्हणजे याआधीच्या निवडणुकांमध्ये ब्रू लोकांना मतदान करण्यासाठी त्रिपुरा-मिझोरामच्या सीमारेषेवर विशेष मतदान केंद्रे स्थापन केली जात असत.

ऐझवाल-3 मतदारसंघात चुरशीची लढत…

ऐझवाल-3 मतदारसंघात गतवेळप्रमाणे याहीवेळी चुरशीची लढत होणे अपेक्षित आहे. गतवेळी मिझो नॅशनल फ्रंटच्या लाल पुंआमुईया यांनी काँग्रेसचे उमेदवार लाल थंझारा यांचा 434 मतांनी पराभव केला होता. ऐझवाल-3 हा ऐझवाल जिल्ह्यातील अनु. जमातींसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे.

थोरागाँग मतदारसंघात काँग्रेस चौथ्यांदा जिंकणार?

मिझोराममधील थोरागाँग मतदारसंघात सलग तीनदा काँग्रेसने विजय मिळवला होता. या पार्श्वभूमीवर चौथ्यांदा हा मतदारसंघ काँग्रेसच्याच ताब्यात राहणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सलग तीन निवडणुकांत काँग्रेसच्या झोडिन्टुंगला राल्टे यांनी विजय मिळवला होता, याहीवेळी ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गत तीन निवडणुकांत त्यांचे विजयाचे मार्जिन क्रमश 4499, 6423 आणि 4442 मतांचे होते. अनु. जमातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातील एकूण मतदार संख्या 13 हजार 175 इतकी आहे.

SCROLL FOR NEXT