Latest

“मिट्टी में मिला देंगे…” : युपी विधानसभेत योगी आदित्‍यनाथ गरजले, अखिलेश यांचा भाषेवर आक्षेप

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील एकाही माफियाला आम्‍ही सोडणार नाही. माफियांचा समूळ नाश करु ( मिट्टी में मिला देंगे…" ) असा इशारा आज ( दि. २५ ) उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी विधानसभेत बोलताना दिला. विधानसभेचे कामकाज सुरु झाल्‍यानंतर विरोधी पक्ष नेते अखिलेश यादव यांनी राजू पाल हत्‍याप्रकरणातील मुख्‍य साक्षीदाराचा खून प्रकरणी सरकारला धारेवर धरले. राज्‍यातील कायदा व सुव्‍यवस्‍था उद्‍ध्‍वस्‍त झाल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. याला उत्तर देताना योगी आदित्‍यनाथ यांनी विरोधी पक्षांना धारेवर धरले.

समाजवादी पार्टीकडून माफियांना खतपाणी

अखिलेश यादव यांच्‍या प्रश्‍नाला उत्तर देताना आदित्‍यनाथ म्‍हणाले की, राज्‍यातील माफियांना आम्‍ही धूळीस मिळवू. समाजवादी पार्टीनेच अतिक अहमदला आश्रय दिला आहे. आम्‍ही राज्‍यातील एकाही माफियाला सोडणार नाही. समाजवादी पार्टी राज्‍यातील माफियांना खतपाणी घालत आहे. राजूपाल हत्‍या प्रकरणात अतीक अहमद दोषी आहे. त्‍याला आमदार करुन समाजवादी पार्टीने राजाश्रय दिला, असा टोला त्‍यांनी अखिलेश यादव यांच्‍याकडे पाहत लगावला. अखिलेश यादव यांना इशारा देत योगी आदित्‍यनाथ म्‍हणाले की, "तुम्‍ही स्‍वत: माफियांचे पोषण करत आहात."

अखिलेश यांचा योगींच्‍या भाषेवर आक्षेप

या वेळी योगी आदित्‍यनाथ यांच्‍या भाषेवर अखिलेश यादव यांनी आक्षेप घेतला. यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विधानसभा अध्‍यक्ष सतीश महाना यांनी या प्रकरणाची दखल घेतल्‍यानंतर पुन्‍हा एकदा सभागृहाचे कामकाज सुरु झाले.

शुक्रवारी ( दि. २४ ) बहुजन समाज पार्टीचे आमदार राजूपाल यांच्‍या हत्‍या प्रकरणातील मुख्‍य साक्षीदार आणि वकील उमेश पाल यांची गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली. या हल्‍ल्‍यात उमेश यांचे बॉडीगार्ड संदीप निषाद यांचाही मृत्‍यू झाला. आमदार राजू पाल यांची २५ जानेवारी २००५ रोजी हत्‍या करण्‍यात आली होती. या हत्‍येप्रकरणी माफिया अतिक अहमद आणि त्‍याचा लहान भाऊ माजी आमदार अश्रफ यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे.

राजकीय विश्वासार्हतेचा हा सर्वात मोठा पुरावा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्‍हणाले की, "राजकीय विश्वासार्हतेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे जनतेचा आदेश. २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत तसेच २०१७ आणि २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये लोकांनी भाजपच्या बाजूने जनादेश दिला आहे. राजकीय विश्वासार्हतेचा हा सर्वात मोठा पुरावा आहे."

रामचरितमानस वादावर दिले उत्तर

मुख्यमंत्री योगी यांनी आपल्या भाषणात रामचरितमानस वादावरही प्रतिक्रिया दिली. ते म्‍हणाले, "या पुस्तकाने हिंदू समाजाला शतकानुशतके एकसंघ ठेवले आहे. आज त्याचा अपमान होत आहे. इतर कोणत्याही धर्मग्रंथाबद्दल याच गोष्टी सांगितल्या असत्या तर काय झाले असते माहीत नाही. रामचरितमानस उत्तर प्रदेशच्या भूमीवर रचला गेला आहे, परंतु हिंदूंचा अपमान होत आहे. अखिलेश यांची खिल्ली उडवत मुख्यमंत्री योगी म्हणाले की, सत्ता वारशाने मिळते; पण बुद्धिमत्ता सापडत नाही.

यूपीमध्ये काबा… पण योगींनी उत्तर दिले

या वेळी मुख्यमंत्री योगी यांनी सरकारच्या कामगिरीचे वर्णन करताना सांगितले की, आताही लोक विचारतात की, यूपीमध्ये काय झाले. यूपीमध्ये का बा… उत्तर यूपीमध्ये बाबा आहेत….

SCROLL FOR NEXT