Latest

Mithali Raj : “शब्बास मिठू”…. ३३३ सामने, १० हजार ८६८ धावा आणि अनेक अबाधित विक्रम

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेटची महान खेळाडू मिताली राजने (Mithali Raj) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्स मधून निवृत्ती घेतली आहे. 23 वर्षांच्या कारकिर्दीत मितालीने मोठे यश संपादन करून अनेक विक्रमांना गवसणी घातली. ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटर आहे. त्याचबरोबर महिला वनडे विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. मितालीने 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ती पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळली. तर, न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला गेलेला सामना तिचा शेवटचा सामना ठरला.

मितालीला (Mithali Raj) 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2017 मध्ये विस्डेन लीडिंग वुमन क्रिकेटर इन द वर्ल्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. मितालीला 2015 मध्ये पद्मश्री पुरस्कारही गौरविण्यात आले. तर 2021 मध्ये तिला खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मिताली राजचे (Mithali Raj) विक्रम आणि उपलब्धी :

  • मितालीला 'भारतीय महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर' म्हटले जाते. ती भारतासाठी वनडे आणि टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.
  • 2017 च्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान, मितालीने सलग सात अर्धशतके झळकावली होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे.
  • एका संघासाठी सर्वाधिक सलग महिला वनडे (109 सामने) खेळणारी मिताली (Mithali Raj) ही एकमेव खेळाडू आहे.
  • विश्वचषक स्पर्धेत 1000 हून अधिक धावा करणारी मिताली ही पहिली भारतीय आणि पाचवी महिला क्रिकेटपटू आहे.
  • मिताली ही वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिने 232 सामन्यात 7805 धावा केल्या आहेत.
  • T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारी मिताली (Mithali Raj) ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.
  • 20 वर्षांहून अधिक काळ खेळणारी मिताली ही पहिली महिला क्रिकेटपटू देखील आहे.
  • 200 वनडे सामने खेळणारी मिताली एकमेव महिला क्रिकेटर आहे.
  • 2005 आणि 2017 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने भारतीय संघाचे नेतृत्व केले.
  • एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 24 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा विक्रम मितालीच्या नावावर आहे. तिने यंदाच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कला (23 सामने) मागे टाकले होते.
  • सहा एकदिवसीय विश्वचषक खेळणारी मिताली ही एकमेव महिला खेळाडू आहे. पुरुषांमध्ये भारतासाठी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
  • भारताकडून कसोटीत द्विशतक झळकावणारी मिताली ही एकमेव महिला फलंदाज आहे. मितालीने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध 214 धावा केल्या होत्या. महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासतील ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT