Latest

Miss Universe 2023 : कोण आहे श्वेता शारदा, मिस युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : यावर्षी ७२ वी मिस युनिव्हर्स स्पर्धा (Miss Universe 2023) १८ नोव्हेंबर २०२३ रोजी सॅन साल्वाडोर, अल साल्वाडोरमध्ये जोस एडोल्फो पिनेडा एरिनामध्ये आयोजित केली गेली आहे. या स्पर्धेत २३ वर्षाची श्वेता शारदा १९ नोव्हेंबर, २०२३ रोजी भारताचे प्रतिनिधीत्व करेल. श्वेता शारदा एक प्रतिभाशाली मॉडल, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. (Miss Universe 2023)

श्वेता शारदाने आपल्या इन्स्टाग्रावर एक फोटो शेअर केला आहे. मिस दिवा युनिव्हर्स २०२२ चे मुकूट परिधान केल्यानंतर आता ती ७२ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करेल. त्याशिवाय सोनल कुकरेजा मिस सुपरनॅशनल २०२३ च्या १२ व्या एडिशनमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करेल. श्वेता शारदा पंजाबमधील चंदिगढची राहणारी आहे.

श्वेता शारदा जेव्हा १८ वर्षांची होती, तेव्हा ती आपले शहर सोडून मुंबईत आली होती. श्वेता शारदा एक मॉडल, डान्सर, कोरिओग्राफर आणि ब्युटी पेजेंट होल्डर आहे. फेमिना ब्युटी पेजेंट्सनुसार, श्वेताने सीबीएई बोर्डअंतर्गत आपले शिक्षण पूर्ण केले. ती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पुढील शिक्षण पूर्ण करत आहे.

करिअरच्या सुरुवातीला श्वेताने अनेक डान्स-रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला. श्वेताने डान्स इंडिया डान्स सीझन ६, डान्स दिवानेच्या पहिल्या सीजन आणि डान्स प्लस ६ मध्येही भाग घेतला होता. श्वेता शारदाने झलक दिखला जा सीजन १० मध्ये कोरिओग्राफर म्हणून काम केलं आहे. श्वेताने म्युझिक व्हिडिओ "मस्त आंखें"मध्ये अभिनेता, डान्सर शांतनु माहेश्वरीसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये, शारदा हिला मिस दिवा २०२३ (Miss Diva 2023) स्पर्धेत विजेती घोषित करण्यात आले होते.

SCROLL FOR NEXT