Latest

शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराबाबत दुजाभाव ; विविध खेळांतील क्रीडापटूंची तक्रार

अमृता चौगुले
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून दिला जाणारा महत्त्वाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारामध्ये पात्र खेळाडूंना डावलले जात असून, हा मोठा अन्याय क्रीडा विभागाच्या प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप विविध खेळांतील खेळाडूंनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, या विरोधात उच्च न्यायालयात याचिका ही दाखल करण्यात आली असून, न्याय न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशाराही खेळाडूंनी या वेळी दिला.
या आयोजित पत्रकार परिषदेला विराज परदेशी (मॉडर्न पेंटाथलॉन), केतकी गोखले (जिमनॅस्टिक), ऋषिकेश अरणकल्ले (मल्लखांब), राजेश्री गुगळे (जलतरण, वॉटरपोलो) आणि पूजा सानप (रोईंग) या खेळाडूंसह इतर खेळांतील खेळाडू उपस्थित होते. या वेळी विराज परदेशी म्हणाला की, अनिल चोरमले आणि सुहास पाटील या दोन्ही अधिकार्‍यांवर लाच घेतल्याचे गुन्हे आहेत. बोगस प्रमाणपत्र घोटाळ्यात चोरमलेंना अटकदेखील झाली होती. सुहास पाटील यांच्यावर 1 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर पैसे घेऊन पुरस्कार दिल्याचा गुन्हादेखील दाखल आहे. असे अधिकारी खेळाडूंची पुरस्कार पडताळणी कसे करू शकतात, करत असतील, तर तो खेळाडूंच्या मेहनतीचा अपमान आहे.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या बाबतीत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला सातत्याने डावलण्यात येत आहे. पुरस्कार निवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या बैठकीस क्रीडा तज्ज्ञ, तर सोडा क्रीडामंत्रीही उपस्थित नव्हते. यामुळे गुणवत्ता असूनही आम्हाला डावलण्यात आले असल्याचा आरोप राजेश्री गुगळे या खेळाडूने केला आहे.
यंदाच्या पुरस्कारांबाबत क्रीडा आयुक्तांनी सातत्याने क्रीडामंत्र्यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केली आहे. क्रीडामंत्र्यांनी पुरस्कारांबाबत बैठक घेण्यास सांगितले, तर क्रीडा आयुक्तांनी संपूर्ण पुरस्कार पद्धत नव्याने राबवावी लागेल असे सांगून बैठक टाळली. शिवछत्रपती पुरस्कारासाठी 900 अर्ज आले असताना 2500 अर्ज आल्याची खोटी माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर आम्ही महाराजांच्या नावाने पुरस्कार देतो, खिरापत वाटत नाही, असे वक्तव्य केले असल्याचा आरोप जिमनास्टिक खेळाडू केतकी गोखले हिने या वेळी केला.
पुरस्कारासाठी नजीकच्या काळातील तीन वर्षांतील कामगिरी लक्षात घेतली जाते. या वेळी कोरोनाचा अडथळा होता. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन देशभरात या वर्षासाठी सर्वांना सवलत देण्यात आली. मग, आपल्याकडे का नाही. यानंतरही दोन वर्षांतच खेळाडूंनी 16 पेक्षा अधिक गुणांकन मिळविले आहे. तरीही आम्हाला डावलले जात असून, या अन्यायाला आगामी काळात अधिक जोमाने वाचा फोडणार आहोत.
                                                              – विराज परदेशी, खेळाडू, मॉडर्न पेंटाथलॉन
शिवछत्रपती पुरस्काराबाबातची नियमावली तयार करताना एमओए प्रतिनिधीसह संघटनांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्याशी चर्चा करून केलेली आहे. नियमानुसार जे खेळाडू अपात्र ठरत आहेत त्यांना डावलले म्हणणे चुकीचे आहे. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवर अधिकार्‍यांबाबत केलेले आरोप चुकीचे आहेत. सर्व समितीच्या तपासणीतून पुढे गेलेल्या प्रस्तावावर क्रीडामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने ज्यामध्ये विविध पुरस्करार्थीं सदस्यसह एमओएचे सचिव ही होते. त्या समितीने पडताळणी केलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचे आहे. 
                                                  – सुहास दिवसे, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय.
हेही वाचा : 
SCROLL FOR NEXT