Latest

रोज एक अंडे खाल्ल्याने शरीराला मिळतात ‘हे’ ५ फायदे

Arun Patil

लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना फिट राहण्यासाठी अंडे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, तरीही अंडे खावे की नाही, याविषयी अनेक मते व्यक्त होत असतात.

वास्तविक अंडी मोठ्या प्रमाणावर खाल्ली जातात, याचे प्रमुख कारण म्हणजे ती खाण्यासाठी तयार करताना फार यातायात करावी लागत नाही. ती नुसती उकडून, तळून, एखाद्या पदार्थात घालून खाता येतात आणि त्यातून पोषक घटकही भरपूर मिळतात.

बरेच जण सकाळच्या नाश्त्यात अंड्याचा वापर करतात. उकडलेले अंडे, ऑम्लेट किंवा दुधातून अंडे अशा अनेक प्रकारांनी अंड्याचे सेवन केले जाते. नाश्त्याच्या वेळीच भाजीत अंडे घालून चपाती, भाकरी किंवा गव्हाच्या ब्रेडबरोबर खाल्लेत, तर तुमच्या पूर्ण दिवसाचे जेवणच होऊन जाते.

अंड्यावर अनेक वर्षे बरीच चर्चा सुरू आहे. मात्र डॉक्टर्स आणि वैज्ञानिक अंडे आरोग्यदायी असल्याचेच वारंवार सांगत आहेत. अंडे खायचे की नाही, किती खायची आणि अंड्यांमुळे हृदयविकार होतो का, वजन वाढते का असे एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. यातील बरेचसे प्रश्न म्हणजे गैरसमजाचाच भाग आहेत. वस्तुत: अंड्याचे अनेक फायदे आपल्याला होतात. अंड्यांमुळे वजन वाढते, अशी समजूत आहे. प्रत्यक्षात अंडे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. प्रत्येक अंड्यात 70 कॅलरी असतात आणि त्यात प्रोटिन म्हणजे प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. हे प्रोटिन शरीरातील ग्लुकागॉन नावाचा स्राव स्रवण्यास कारणीभूत ठरते. या स्रावामुळे शरीराला साठलेले फॅट्स (चरबी) आणि कर्बोदकांचा वापर करण्यास मदत होते.

अंड्यांमुळे कोलेस्टेरॉल वाढते, अशीही एक समजूत आहे आणि ती खरी आहे. प्रत्येक अंड्यात अंदाजे 200 मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल असते. पण, याबाबत संशोधकांचे म्हणणे असे आहे की, हे कोलेस्टेरॉल आहाराला पूरक असे आहे. कारण सॅच्युरेटेड फॅट्समुळे घातक कोलस्टेरॉल तयार होते, तसे अंड्यामुळे होत नाही. त्यामुळे अंडे खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर साचून त्यात अडथळा निर्माण होतो ही समजूत चुकीची आहे. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाने यावर संशोधन केले असून, त्यांचा निष्कर्ष आहे की रोज एक अंडे खाल्ल्याने खरे तर एचडीएल-चांगले कोलेस्टेरॉल वाढते आणि कमी कर्बोदकयुक्त आहार घेण्यात मदत करते.

अंड्याच्या पांढर्‍या भागामध्ये शुद्ध प्रोटिन असते आणि त्यात अजिबात फॅट नसते आणि म्हणून अंड्यातील पिवळा बलक काढून पांढरे तेवढे खावे, अशी समजूत बर्‍याच जणांची आहे; पण पिवळ्या बलकातही फॅट, पोषक घटक आणि प्रोटिन असतात. यात 240 मिलिग्रॅम ल्युसिन नावाचा घटक असतो. हे ल्युसिन अ‍ॅमिनो अ‍ॅसिड आहे आणि त्यामुळे स्नायू मजबूत व्हायला मदत मिळते. अंड्यातील पिवळ्या बलकात कॉलीन नावाचे कोलेस्टेरॉल असते. ते सेल मेम्ब्रेनला म्हणजे पेशींच्या आवरणाला व्यवस्थित काम करण्यास मदत करते. वेगवेगळ्या हार्मोन्सचा कणीय संरचना म्हणूनही कॉलीन काम करते. याशिवाय अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये अ, ड आणि इ ही जीवनसत्त्वे असतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT