Latest

पुणेकरांना बसणार फटका! कात्रज दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ, उद्यापासून नवे दर लागू

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दूध खरेदीसाठीची स्पर्धा तीव्र झाली असून, संकलनासाठी रस्सीखेच सुरू झालेली आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गायीच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटरला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर म्हशीच्या दूध खरेदीदरात वाढ न करता विक्रीदरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे.
कात्रज दूध संघाकडून गायीच फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणप्रतीच्या दुधाचा खरेदी दरलिटरला 35 रुपये होता.

तो दोन रुपयांनी वाढवून 37 रुपये करण्यात आला आहे. तर वरकड खर्चासह दूध संस्थांसाठी हा दर 37 रुपये 80 पैसे राहील. तर गायीच्या दुधाचा विक्रीचा दरलिटरला 54 रुपयांवरून आता 56 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे शेतकर्‍यांना वाजवी दर देताना ग्राहकांवर दूध दरवाढीचा बोजा टाकण्यात आला आहे.

दरम्यान, कात्रज दूध संघाचे रोजचे दूध संकलन मागील पंधरा दिवसांपूर्वी सुमारे 2 लाख 15 हजार लिटरइतके होत होते. ते घटून सध्या 1 लाख 92 हजार लिटरपर्यंत खाली आले आहे. दूध खरेदीसाठी स्पर्धा वाढू लागल्यामुळे अधिक दर देणार्‍या डेअर्‍यांकडे संकलन वाढल्याने संघाचे दूध संकलन घटू लागले. त्यामुळे दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती संघाच्या प्रभारी व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधुरी ढमाले यांनी दिली.

म्हशीच्या दूध विक्री दरवाढीने ग्राहकांवर बोजा
म्हशीच्या दुधाचा खरेदी दर वाढविण्यात आलेला नाही. मात्र, विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय कात्रज दूध संघाने घेतलेला आहे. त्यानुसार म्हशीच्या दुधाचा प्रतिलिटर दर 70 रुपयांवरून 72 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे म्हशीच्या दूध खरेदी दरात कोणतीही वाढ न करता विक्री दरवाढ करू संघाने ग्राहकांचा खिसा कापल्याचे स्पष्ट होत आहे.

इंधनांच्या दरात झालेली वाढ, पशुखाद्यांचे वाढलेले दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना मदत करण्याच्या हेतूने संघाने दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खरेदी दर वाढल्यामुळे विक्रीच्या दरातही वाढ करावी लागत आहे.

                                           – केशरताई पवार, चेअरमन, कात्रज दूध संघ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT