Latest

थंडीच्या प्रभावाने कोकणात हुडहुडी!

Arun Patil

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा :  किमान तापमानात घट झाल्याने आणि अरबी सागरात चक्रीय वार्‍याची स्थिती प्रभावी ठरल्याने बुधवारी रात्रीपासूनच कोकण किनारपट्टी भागात शीतलहरी सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे कोकणात थंडीची हलकी चाहूल सुरू झाली. पुढील काही दिवसांतच तापमानात दोन ते तीन अंशांची घट होऊन कोकण गारठण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सध्या कोकण किनारपट्टी भागात काही दिवसांपासून ढगाळ हवामान असून वातावरणात सतत चढ-उतार होत आहे. जिल्ह्यातील वातावरणात घट झाल्याने धुक्यासह दव पडत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याकारणाने पहाटे गारठा तर दुपारी उकाडा अनुभवायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत थंडी हळूहळू वाढत जात आहे. रत्नागिरीसह किनारी भागात हलका गारठा जाणवू लागला. गुरुवारी तापमापकावरही पारा खाली घसरला. तर शुक्रवारी सकाळी कमाल तापमान 29 अंश सेल्सियस एवढे नोंदविले. दिवसा मात्र उकाडा कायम होता. नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा संमिश्र हवामानाला तोंड द्यावे लागत आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी रात्री रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील किमान तापमान 21.5 अंश सेल्सिअस तर शुक्रवारी कमाल 30.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किमान तापमान गेल्या दोन दिवसांपेक्षा 1 अंशाने कमी होते. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये जोरदार थंडी जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आंबा मोहोरासाठी थंडी पोषक

आंबा मोहोराची प्रक्रिया सध्या सुरू आहे. फवारणीचे काम आंबा बागायतदारांकडून सुरू आहे. या फवारणीला थंडीची जोड मिळावी, अशी अपेक्षा आंबा बागायतदारांची आहे. मागील दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढू लागल्याने आंबा बागायतदार सुखावले आहेत.

SCROLL FOR NEXT