Latest

सतत डोकं दुखतंय! मायग्रेनचा त्रास असू शकतो, यावर ‘हा’ सोपा उपाय करा

Arun Patil

डोकं दुखणं ही तशी सामान्य गोष्ट मानली जाते. पण त्याचं सातत्य वाढत राहणं आणि डोक्याच्या एका भागात दुखणं सुरू होऊन ते सगळीकडे पसरत जात असेल, तर ही सामान्य डोकेदुखी नसून तो मायग्रेनचा एखादा प्रकार असू शकतो.

डोक्यातली एखादी शीर सुजून त्यामुळे डोके दुखत असेल, तर हा मायग्रेनचा प्रकार असू शकतो. अर्धशिशी हे त्याला आपल्या भाषेतलं नाव आहे. हलक्या प्रकारचे दुखणे सुरू होऊन ते हळूहळू वाढत जाते, हे त्याचे प्रमुख लक्षण आहे. मायग्रेनचं दुखणं 4 ते 72 तासांपर्यंत असू शकतं. सुरुवातीला डोक्याच्या मागच्या भागात हे दुखणं सुरू होतं आणि नंतर पूर्ण डोक्यात पसरू शकतं. काहीवेळा डोक्याचा अर्धा भाग दुखतो आणि नंतर उरलेला भाग दुखतो. त्याची लक्षणं वेगवेगळी असू शकतात. पण डोकं दुखण्याचा त्रास सगळ्याच प्रकारात असतो. मायग्रेन ही आजच्या जीवनशैलीची देणगी आहे, असंही म्हणायला हरकत नाही. वेळीअवेळी जेवण, रात्रीची पूर्ण झोप न घेणं आणि कामाचा तणाव यामुळे कधी मायग्रेन आपल्या जीवनात एन्ट्री घेतो हे आपल्याला कळतही नाही. मायग्रेन औधषांनी पूर्ण बरा होणारा रोग नाही कारण तो जीवनशैलीवर आधारित रोग आहे. त्याची पथ्यं पूर्ण पाळली तर त्याचा त्रास कमी होऊ शकतो.

मायग्रेन का होतो याची विविध कारणं असली तरी प्रामुख्याने डोक्यातील शिरा सुजल्यामुळे, त्यातील रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात आणि दुखणे सुरू होते. काहीवेळा डोक्यात कळा येतात. त्याचे प्रमाण सुरुवातीला कमी असले तरी जसा वेळ वाढतो तशी दुखण्याची तीव्रताही वाढते. मायग्रेनसाठी डॉक्टरांकडून औधषे घेणे हा एक उपाय असू शकतो. पण त्यातूनही जीवनशैलीत मोठे बदल न करणे, हा त्यावरचा सगळ्यात चांगला उपाय आहे. वेळेवर जेवण आणि झोप ही मायग्रेन टाळण्याची दोन मुख्य शस्त्रं आहेत. याशिवाय कोणत्या कारणाने डोके दुखते याचा शोध घेऊन ती टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. यात उन्हात हिंडल्याने डोके दुखणे, कॉम्प्युटर किंवा टीव्हीसमोर बसल्याने हा त्रास होणे किंवा जागरणाने मायग्रेनचा त्रास होणे, ही काही सामान्य लक्षणे आहेत. त्यापैकी तुम्हाला कोणते कारण त्रासदायक ठरत आहे, याचा विचार करायला हवा. पोट साफ नसल्यानेही काहीवेळा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे यातील कोणती कारणं आपण टाळू शकतो, याचा विचार करायला हवा.

जीवनशैलीत सातत्य ठेवणं हा मायग्रेनचा त्रास कमी करण्याचा मुख्य उपाय असू शकतो. यासाठी वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप यावर लक्ष ठेवलं पाहिजे. कडक उन्हात किंवा थंडीत, वार्‍यात पुरेसं संरक्षण न घेता बाहेर पडू नये. डोळ्यावर प्रकाश येणार नाही अशी व्यवस्था करून झोप घेण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टरांनी दिलेल्या औधषांबरोबर ही काळजी घेतली, तर दुखणे कमी करायला मदत होऊ शकते. डोळ्यावर गार पाण्याचे हबके मारून अंधार्‍या खोलीत जाऊन विश्रांती घेण्याने डोके दुखणे खूपच कमी होते. जेवणात जास्त मसालेदार पदार्थ खाण्याऐवजी फायबरयुक्त पदार्थ घ्यावेत. थोड्या थोड्या वेळाने खावे.

एकदम भरपेट खाऊ नये. मायग्रेन असणार्‍यांनी उपवास करण्याच्या भानगडीत पडू नये. भरपूर पाणी पिण्यानेही फायदा होऊ शकतो. उग्र वास असलेले परफ्यूम अगर स्प्रे मारू नयेत. 16 वर्षांच्या खालील माणसांना हा त्रास होत असेल, तर डोकेदुखी थांबवण्यासाठी एस्प्रीन किंवा बु्रफेन अशी दर्दनिवारक औधषे घेऊ नयेत. ज्या हंगामात जी फळे आणि भाज्या उपलब्ध आहेत, त्यांचे सेवन करण्याने फायदा होतो. फायबरयुक्त आहार घेतल्याने आराम मिळतो. ज्यात जास्त फॅट आहेत असे पदार्थ टाळायला हवेत. नियमित व्यायाम करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मोकळ्या हवेत फिरल्यानेही मायग्रेनचा त्रास बर्‍याच प्रमाणात कमी होतो. मायग्रेनचा त्रास हा कोणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो, त्यामुळे डोकेदुखीकडे दुर्लक्ष कधीच करू नये. त्यावर डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य जीवनशैली यांनी मात करता येऊ शकते. पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

SCROLL FOR NEXT