Latest

Rohit Sharma : रोहित शर्मा संतापला, CSK विरुद्धच्या पराभवानंतर म्हणाला…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खूपच निराश झाला आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत तळाला होता. यावेळीही या संघाची सुरुवात खराब झाली आहे. संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले असून या खराब कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माने आपल्या एमआय संघातील अनेक त्रुटी उघड केल्या आहेत. वरिष्ठ खेळाडूंना चांगली कामगिरी करून संघाला गती द्यावी लागेल, असा सल्ला त्याने दिला आहे.

'मधल्या षटकांमध्ये 30 ते 40 धावा कमी झाल्या'

रोहित (Rohit Sharma) म्हणाला, 'सीएसके विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना आम्ही चांगली सुरुवात केली पण याचा फायदा पुढे घेऊ शकलो नाही. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. मात्र, मधल्या षटकांमध्ये आम्ही वेग गमावला. होम ग्राउंडवर खेळताना आम्ही मधल्या षटकांमध्ये 30 ते 40 धावा कमी केल्या. आम्हाला रोखण्याचे श्रेय सीएसकेच्या फिरकीपटूंना जाते, त्यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यांनी आमच्यावर दबाव आणला आणि आम्ही त्यांना उत्तर देऊ शकलो नाही,' असे स्पष्ट केले.

'आपण आक्रमक व्हायला हवे'

'मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना काही वेगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे. आपण आक्रमक व्हायला हवे, निर्भय असायला हवे. आमच्याकडे काही युवा खेळाडू आहेत, त्यांना थोडा वेळ लागेल. पण आपण त्यांना साथ देत राहायला पाहिजे, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आता वरिष्ठ खेळाडूंना जबाबदारी घ्यावी लागणार आहे. यात माझाही समावेश आहे. आयपीएलचे स्वरूप आपल्याला माहीत आहे. आम्हाला आता लयीत येण्याची गरज आहे आणि आम्ही ते करू शकलो नाही तर हा हंगाम देखील कठीण होईल. फक्त दोन सामने झाले आहेत, पुढील सामन्यात नक्कीच चांगले प्रदर्शन करीन,' असा विश्वासही रोहित शर्माने (Rohit Sharma) व्यक्त केला.

चेन्नईकडून मुंबईचा 7 गडी राखून पराभव

आयपीएल 2023 च्या दुसर्‍या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्जने 11 चेंडू बाकी असताना 7 गडी राखून सहज पराभव केला. टॉस जिंकून पहिला गोलंदाजी करणा-या चेन्नईने मुंबईला अवघ्या 157 धावांत रोखले. नंतर, अजिंक्य रहाणेच्या (61) धमाकेदार खेळीच्या बळावर चेन्नईने 18.1 षटकांत लक्ष्य गाठले. याआधी मुंबईला पहिल्या सामन्यातही दारूण पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबीने रोहित शर्माच्या संघाचा 8 गडी राखून पराभव केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT