Latest

आता हवामान विभागही देणार मलेरियाचा अलर्ट ; लवकरच तयार करणार अ‍ॅप

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  आता डॉक्टरच नव्हे, तर हवामान विभाग देखील मलेरियाची साथ कुठे तीव्र होणार आहे, याचा अलर्ट देणार आहे. मलेरियाचा उद्रेक समजण्यासाठी हा विभाग अ‍ॅप तयार करणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

डॉ. होसाळीकर यांनी दै. 'पुढारी'ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या बाबी वाचकांसाठी सांगितल्या. ते म्हणाले की, हवामान हा घटक सर्वच क्षेत्रांवर प्रभाव टाकत असल्याने अनेक विभागांना आमची मदत लागत आहे. त्यात सर्वाधिक मदत आरोग्य विभागाला होणार आहे. आपल्या हवामानात बदल झाला की देशाच्या विविध भागांत मलेरियाचा उद्रेक होतो. त्याचा अलर्ट सध्या आमच्या 'मौसम डॉट जीओव्ही' या संकेत स्थळावर मिळतो आहे. मात्र, त्याला अधिक वेगवान करण्यासाठी लवकरच मलेरिया अलर्ट अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे.

आरबीआय, सेबीसोबत काम…
हवामानावर आर्थिक गणित अवलंबून असते, याचा विचार करीत आता हा विभाग अनेक मोठ्या संस्थांसोबत काम करणार आहे. आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी, पॉवर फाउंडेशनसोबत काम करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

अ‍ॅप वापरा, हानी टाळा…
शेतकरी जेव्हा शेतात असतो तेव्हा त्याला विजांचा कडकडाट झाला की कुठे उभे राहावे, हे सुचत नाही. तो उघड्या शेतावर असतो किंवा झाडाखाली आडोसा घेतो, तेथेच नेमकी वीज पडून त्याचा मृत्यू होऊ शकतो. जर हवामान विभागाचे अलर्ट बघण्याची सवय लावून घेतली, तर कुठे काय परिस्थिती आहे, याचा अंदाज येऊन जीवितहानी टाळता येईल, असेही डॉ. होसाळीकर यांनी सांगितले.

या अ‍ॅपवर बघा हवामानाचे महत्त्वाचे अलर्ट

मेघदूत : या अ‍ॅपवर पावसाच्या पूर्वानुमानाची माहिती मिळते. शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकांसाठी अ‍ॅप उपयुक्त आहे.

दामिनी : हा अलर्ट अ‍ॅप असून, विजांच्या कडकडाटासह त्यांचा धोका कोणत्या भागात होऊ शकतो, याचा अंदाज मिळतो. शेतकर्‍यांसह सर्वांना अत्यंत महत्त्वाची माहिती देणारे हे अ‍ॅप आहे.

आयएमडी (मेडिकल रिसोर्सेस) ः यावर तब्बल 20 हजार मेडिकल जर्नलचा डेटाबेस आहे. यात विविध प्रकारच्या साथीच्या आजारांची माहिती व प्रादुर्भाव दिला जातो. विद्यार्थ्यांसाठी माहितीचा मोठा खजिनाच येथे उपलब्ध आहे.

मौसम : या अ‍ॅपवर हवामानाची सखोल व शास्त्रीय माहिती दिली जाते. यात पूर्वानुमानासह डॉप्लर रडारने टिपलेली छायाचित्रे बघता येतात.

आयएमडी (पब्लिक ऑब्झर्वेशन)ः यावर पाऊस कुठे व किती पडला, विजांचा कडकडाट कुठे झाला, धुळीचे, बर्फाचे वादळ कुठे झाले, हे तुम्ही स्वतः फोटोसह टाकू शकता. खास नागरिकांनी दिलेली माहिती यावर दिली जाते.

पुणे वेदर लाइव्ह : यावर फक्त पुण्यातील हवामानाची माहिती मिळते. पाऊस कुठे, किती पडणार आहे, याची संपूर्ण माहिती मिळते.

SCROLL FOR NEXT