Latest

Breast Cancer Awareness : पुरुषांना स्तनांचा कॅन्सर होतो का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त स्त्रियांना होतो का? की याचा धोका पुरुषांनाही असतो. (Breast Cancer Awareness) कदाचित बहुतांश जणांना याबद्दलची माहिती नाहीये की, पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर (स्तनांचा कर्करोग) होऊ शकतो. पुरुषांमधील ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणेही दिसून येतात. वेळीच याचा धोका ओळखला तर या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो. (Breast Cancer Awareness)

संबंधित बातम्या –

एखाद्या पुरुषाला झालेला कर्करोग हा दुर्मिळ असतो. पण तरीही ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे आढळू शकतात. त्यामुळे आपल्या शरीरीकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे असते. वेळीच लक्षणे ओळखून निदान झाले उपचार करता येतात. पण, पुरुषांमधील ब्रेस्ट कॅन्सरबाबत फार माहिती नसणे यामुळे पुरुषाच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. या आजारात स्त्रियांपेक्षा पुरुषांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे म्हटले जाते.

पुरुषांच्या ब्रेस्ट कॅन्सरची ही आहेत लक्षणे

स्त्रिया आणि पुरुषांमध्ये लक्षणे सारखीच आढळतात. विशेषत: अनुवांशिकतेमुळे पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. स्तनाग्रांखाली आणि स्तनाग्रांच्या भोवती काळसर त्वचेखाली टणक गाठी येणे, ही लक्षणांची सुरुवात असते. कधी कधी या गाठीतून स्राव (रक्तस्त्राव) होतो. कधी कधी या गाठी मोठ्या होऊ शकतात. तसेच सूज येणे, त्वचा कडक होणे, गाठी वाढणे अशी लक्षणेही दिसतात.

वेळीच सजग व्हा

लक्षणे दिसताच पुरुषांनी तपासणी करून घ्यावी. ब्रेस्ट टिश्यूच्या मॅमोग्राम आणि बायोप्सीद्वारे या रोगाचे निदान होऊ शकते. सर्जरी करणे, किमोथेरेपी करणे आणि हार्मोन थेरेपीदेखील करून आजार वाढीवर नियंत्रण होऊ शकते. सामान्यपणे, मॅस्टेक्टॉमी केली जाते. यामध्ये शस्त्रक्रिया करून ब्रेस्टचा टिशू काढून टाकला जातो. शिवाय, रेडिएशनद्वारेदेदेखील उपचार केले जातात. बीआरसीए १ आणि बीआरसीए २ या जनुकीय चाचण्यादेखील केल्या जातात. त्यामुळे लक्षणे दिसताच वेळीच सजग होऊन तपासणी करणे आणि उपचार घेणे, यामुळे रुग्णाचा आजार नियंत्रित करू शकतो. (Breast Cancer Awareness )

काय म्हणतात डॉक्टर?

डॉ. चंचल गोस्‍वामी, ॲडवान्‍स्‍ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, ऑन्‍कोलॉजिस्‍ट, कोलकाता म्‍हणाले, "विशेषत: भारतातील शहरी भागामध्‍ये स्‍तनाचा कर्करोगाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. अनेक व्‍यक्‍तींना वाटते की स्‍तनाचा कर्करोग हा आजार फक्‍त महिलांना होतो, पण पुरूषांना देखील या प्रकारचा कर्करोग होऊ शकतो हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. दुर्मिळ असले तरी पुरूषांमधील स्‍तनाचा कर्करोग महिलांप्रमाणेच गंभीर व शक्‍यतो जीवघेणा असू शकतो. पुरूषांनी स्‍तनाच्‍या त्‍वचेवर गाठ, सूज किंवा डिम्‍पलिंग या लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच, रूग्‍णांना उपलब्‍ध उपचार पर्यायांबाबत माहित असले पाहिजे आणि आजाराबाबत उत्तमप्रकारे जाणून घेण्‍यासाठी डॉक्टरांसोबत खुल्‍या मनाने व सखोलपणे सल्‍लामसलत केली पाहिजे. लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, अलिकडील प्रगत थेरपीज जवळपास ५० टक्‍के रूग्‍णांमध्‍ये उद्भवू शकणारा पुन्‍हा आजार होण्‍याचा धोका कमी करण्‍यास मदत करू शकतात आणि रूग्‍णांची स्थिती सुधारू शकतात."

अशी घ्या काळजी

कोणताही मानसिक गोंधळ न घालता मेडिटेशन करावे. चिंता, काळजी न करता तमावमुक्त राहण्याचा प्रयत्न करणे. मित्र परिवाराच्या सानिध्यात राहणे. ॲक्टिव्ह राहा, छंद जोपासा, भटकंतीची आवड असेल तर निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा. रोज व्यायाम करणे, धावणे, चालणे अशा क्रिया कराव्यात. निराश न होता, खचून जाता मन उत्साहित ठेवणे, स्वत:ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे. योग्य आहाराकडे लक्ष देणे. पुरेशी झोप घेणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT