Latest

सुळकूड योजनेबाबत 11 सप्टेंबरला मुंबईत बैठक

Arun Patil

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकूड पाणी योजनेबाबत 11 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक घेण्याचे आदेश सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले. याबाबतच्या सर्व कागदपत्रांची माहिती 29 ऑगस्टपर्यंत मंत्रालयामध्ये सादर करण्याचे निर्देशही त्यांनी पत्राद्वारे दिले आहेत. खा. धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन योजनेबाबत चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले.

इचलकरंजी शहरासाठी 'अमृत 2' योजनेंतर्गत पाणी योजना मंजूर आहे. ही पाणी योजना दूधगंगा नदीतून करण्यात येणार आहे. सुळकूड येथे उद्भव धरून प्रस्तावित असणारी ही योजना सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनली आहे. दूधगंगा काठावरील शेतकर्‍यांनी शेतीला पाणी कमी पडेल, या भावनेतून योजनेला विरोध केला आहे. परंतु, इचलकरंजीला पाणी दिल्यानंतरही शेतकर्‍यांना पाणी कमी पडणार नाही, असे शासनाचे नियोजन असतानाही निव्वळ राजकीय हेतू मनात ठेवून इचलकरंजीच्या पाणी योजनेला विरोध होत असल्याचे इचलकरंजीतील लोकप्रतिनिधींचे मत आहे. त्यामुळे प्रस्तावित योजना पूर्ण व्हावी, यासाठी इचलकरंजीच्या जनतेतून रेटा वाढत असल्यामुळे खा. माने यांनी या योजनेसंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.

दूधगंगा काठावरील नागरिकांचे मन वळविण्यासाठी तसेच या योजनेचे समर्थक व विरोधक यांची एकत्र बैठक लावून इचलकरंजीचा पाणी प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या दालनात दुपारी 12 वाजता बैठक लावण्याचे आश्वासन दिले. खा. माने यांनी मुख्यमंत्र्यांचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, सुळकूड पाणी कृती समितीचे निमंत्रक विठ्ठल चोपडे यांच्याकडे सुपूर्द केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT