Latest

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: एमसीव्हीसीच्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष पॉलिटेक्निक प्रवेश

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: एमसीव्हीसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने दिलेल्या सवलतीनुसार बारावीमध्ये निवडलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे. हा निर्णय जुना असला तरी यंदा उत्तीर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

बारावी व्होकेशनल(एमसीव्हीसी) हा व्यावसायिक अभ्यासक्रम आयटीआय आणि पॉलिटेक्निक या दोन अभ्यासक्रमांमधील मधला स्तर मानला जातो. यामुळे गतवर्षीपासून या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने थेट द्वितीय वर्षाला प्रवेशाची संधी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील बारावी व्होकेशनल उत्तीर्ण विद्यार्थी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहू नये, म्हणून शैक्षणिक वर्ष 2022-23 व 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने ही सवलत दिलेली आहे.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे अशी अट होती. ती आता बदलून शैक्षणिक वर्ष 2021- 22 च्या बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, जीवशास्त्र, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल व्हॉकेशनल, अ‍ॅग्रिकल्चर, अभियांत्रिकी ग्राफिक्स,बिझनेस स्टडीज, एंटरप्रीनरशिप या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाले असल्यास अशा विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळणार आहे. ही संधी यंदाही असणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ.विनोद मोहितकर यांनी स्पष्ट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT